(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sarfaraz Khan: सर्फराज खाननं भारतीय कसोटी संघाचं दार ठोठावलं, बांगलादेश दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता
Madhya Pradesh vs Mumbai Final: मुंबईचा फलंदाज सर्फराज खाननं रणजी ट्रॉफीमध्ये दमदार प्रदर्शन करून दाखवलंय.
Madhya Pradesh vs Mumbai Final: मुंबईचा फलंदाज सर्फराज खाननं रणजी ट्रॉफीमध्ये दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. बंळुरूच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सर्फराज खाननं (Sarfaraz Khan) मध्य प्रदेशविरुद्ध शतक झळकावलंय. विशेष म्हणजे, सर्फराजनं रणजी ट्रॉफीतील मागील 12 सामन्यात सात शतक आणि पाच अर्धशतक झळकावलंय. या हंगामात त्यानं आतापर्यंत 900 हून अधिक धावा केल्या आहेत. ज्यामुळं बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सर्फराज खानला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्फराजकडं दुर्लक्ष करणं कठीण
बीसीसीआयच्या सुत्राच्या हवाल्यानं टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, सर्फराज खानला बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. "सर्फराजकडं दुर्लक्ष करणं कठीण आहे. त्याची कामगिरी भारतीय संघावर दबाव टाकत आहे. गतवर्षी दक्षिण आफ्रिकेत भारत अ संघाकडूनही त्यानं चांगली फलंदाजी केली होती. तो एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे", असं बीसीसीआयच्या सुत्रानं म्हटलंय.
सर्फराजच्या शतकामुळं मुंबईची धावसंख्या 350 पार
रणजी ट्रॉफी 2022 मध्ये मुंबईचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खाननं कहर सुरूच ठेवलाय. या हंगामातील अखेरच्या पाच सामन्यात त्यानं तीन शतकं झळकावली आहेत. मध्य प्रदेशविरुद्ध सुरु असलेल्या रणजी
ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याच्या शतकी खेळीमुळं मुंबईचा संघ पहिल्या डावात 350 धावांचा टप्पा पार करू शकला.
सर्फराजची चमकदार कामगिरी
रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात सर्फराज खाननं सहा सामन्यातील आठ डावात 937 धावा केल्या. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत सर्फराज अव्वल स्थानी आहे. त्याची सरासरी 130 पेक्षा अधिक आहे. यादरम्यान त्यानं चार शतक आणि दोन अर्धशतक केली आहेत. रणजी ट्रॉफीच्या मागच्या हंगामातही त्यानं दमदार प्रदर्शन करून दाखवलं. मागील हंगामात त्यानं 154.66 च्या सरासरीनं 928 धावा केल्या आहेत. ज्यात तीन शतकांचा समावेश होता.
हे देखील वाचा-
- ENG vs NZ: असंही आऊट असतं? हेन्री निकोल्सनं विचित्र पद्धतीनं गमावली विकेट, प्रेक्षकही झाले हैराण
- IND vs LEI 1st Day: 21 वर्षाच्या गोलंदाजासमोर भारतीय फलंदाजांचं लोटांगण; केएस भरतनं वाचवली टीम इंडियाची लाज
- Jos Buttler: बटलरची बॅट शांत व्हायचं नावचं घेईना! आता मोडलाय धोनीचा 17 वर्ष जुना षटकारांचा विक्रम