Joe Root: जो रूट थांबायचं नाव घेईना! आता विराट आणि स्मिथच्या खास विक्रमाशी केली बरोबरी
ENG vs NZ: इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटचा (Joe Root) उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे.
ENG vs NZ: इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटचा (Joe Root) उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं अवघ्या 115 चेंडूत शतक पूर्ण केलं. या मालिकेतील त्याचं हे सलग दुसरं शतक आहे. त्यानं याआधी लॉर्ड्स कसोटीत नाबाद 115 धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. दरम्यान, जो रूटनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 27 वं शतक झळकावलं आहे. या कामगिरीसह त्यानं भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) मोठ्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
विराट कोहली- स्टीव्ह स्मिथच्या विक्रमाशी बरोबरी
कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथनं यांनी आतापर्यंत 27 शतक झळकावली आहेत. महत्वाचं म्हणजे, विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचं शतक झळकावलं होतं. तर, स्टीव्ह स्मिथनं जानेवारी 2021 मध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचं शतक ठोकलं. विशेष म्हणजे, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटनं गेल्या 18 महिन्यांत 10 शतक झळकावली आहेत. रुटनं गेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये चार शतक ठोकली आहेत.
कसोटीत 10 हजारांचा टप्पा गाठणारा दुसरा इंग्लंडचा खेळाडू
न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जो रूटनं कसोटी कारकिर्दीतील 10 हजार धावांचा टप्पा गाठला होता. जो रूट आगामी काळात महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडू शकतो, असा अनेक दिग्गजांचा विश्वास आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 200 कसोटी सामन्यांमध्ये 15921 धावा आहेत. जो रूट अवघ्या 31 वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत हा इंग्लिश फलंदाज सचिन तेंडुलकरचा कसोटी धावांचा विक्रम मोडू शकतो, असं मानलं जात आहे. आता येत्या काळात जो रूटचा फॉर्म कसा असेल? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
हे देखील वाचा-