Chhatrasal Stadium Case : हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेला ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अटकेत
नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. अखेर सुशील कुमारला अटक करण्यात आली आहे. माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडच्या मृत्यू प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप सुशील कुमारवर आहे. सुशील कुमारवर एक लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं. सुशील कुमार परदेशात पसार झाला असावा असा संशय पोलिसांना होता. याच पार्श्वभूमीवर देशाच्या सर्व विमानतळांवर सुशील संदर्भात माहिती देण्यात आली होती.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ही कारवाई केली. सुशील आणि आरोपी अजयला दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "पोलीस निरीक्षक शिवकुमार, पोलीस निरीक्षक करमवीर आणि एसीपी अत्तर सिंह यांच्या नेतृत्त्वात स्पेशल सेलनं सुशील कुमार आणि अजयला दिल्लीतील मुंडका परिसरातून अटक केली."
देशाची राजधानी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये 4 मे रोजी पैलवानांमध्ये झालेल्या हाणामारीत माजी ज्युनियर नॅशनल चॅम्पियन सागर धनखडचा मृत्यू झाला होता. त्याच्या हत्येमध्ये सुशील कुमारचा सहभाग असल्याचा आरोप आहे. सागरच्या हत्येनंतर सुशील कुमार आपल्या साथीदारांसह उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पळून गेल्याचं म्हटलं जात होतं. त्याचं अखेरचं मोबाईल लोकेशन हरिद्वारमध्ये सापडलं होतं. त्यानंतर मात्र त्याचा फोन बंद येत होता. तो नेपाळमध्ये पळाल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे नेपाळच्या सीमेवरही बंदोबस्त आणि चौकशी वाढवण्यात आली होती. अखेर सुशील कुमारला दिल्लीतून अटक करण्यात आली.























