(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ : मुंबई कसोटीसाठी स्कोरिंगची सूत्र 'ती'च्या हाती, BCCI कडून दोन महिला स्कोररची नियुक्ती
भारतीय क्रिकेटची पंढरी अशी मुंबईची ओळख आहे. या मुंबईनं आजवर देशाला अनेक रथीमहारथी खेळाडूंची देणगी दिली आहे. त्याच मुंबईकडून उद्या देशाला मिळणारय दोन महिला स्कोररर्सची देणगी. भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये उद्यापासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. विशेष म्हणजे या कसोटी सामन्यासाठी क्षमा साने आणि सुषमा सावंत ह्या दोघींची बीसीसीआयनं अधिकृत स्कोरर म्हणून नियुक्ती केली आहे. मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच एका कसोटी सामन्यात स्कोरिंगची जबाबदारी ही दोन महिला स्कोररर्सकडे असणार आहे. भारतातल्या कसोटी सामन्यात दोन महिला स्कोररर्सच्या नियुक्तीचा हा योग केवळ दुसऱ्यांदा जुळून येत आहे. याआधी सौराष्ट्रच्या सेजल दवे आणि हेमाली देसाई यांनी कसोटी सामन्यात स्कोरिंग केलं होतं. वानखेडेवर उद्यापासूनसुरु होणाऱ्या कसोटीत मुंबईच्या क्षमा साने आणि सुषमा सावंत या स्कोअररची महत्वाची भूमिका पार पाडतील. त्या दोघी २०१० साली बीसीसीआयची स्कोररची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. तेव्हापासून त्या दोघींनी आजवर बीसीसीआयच्या अनेक स्पर्धा आणि आयपीएल सामन्यांमध्येही स्कोररची भूमिका बजावली आहे.