IPL : महाराष्ट्रातल्या चार स्टेडियमवर IPL सामने खेळवण्याचा BCCIचा विचार, शरद पवारांचा हिरवा कंदील ?
देशात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. या रुग्णवाढीमुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आलेत. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनावरही सवाल उपस्थित झालाय. कोरोनामुळे गेल्या वर्षी आयपीएलचा उत्तरार्ध यूएईमध्ये खेळवण्यात आला. मात्र यंदा आयपीएल यूएई किंवा परदेशात खेळवण्यात येणार नसून आयपीएल-2022 चा संपूर्ण हंगाम महाराष्ट्रात खेळवला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील चार स्टेडियमवर सामने खेळवण्याचा प्लॅन बीसीसीआयने आखलाय. मुंबईचं वानखेडे स्टेडियम, त्याच्या शेजारी असलेलं ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील आणि पुणे गहुजे इथं असलेलं महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर संपूर्ण आयपीएलचे सामने आयोजित करण्यात येणार असल्याचे समजतंय. या संदर्भात बीसीसीआयचे अंतरिम सीईओ आणि आयपीएलचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर हेमांग अमीन आणि एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. बीसीसीआयच्या प्रस्तावाला शरद पवारांनी हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती आहे.