Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
शिवसेना नेते रामदास कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना "ऐहसानफरामोश" आणि "गद्दार" अशी विशेषणे लावली. "माझ्या घराला गटार म्हणता, मग दहा वर्षे याच गटारात कशाला येत होतात?" असा सवाल त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत पाठीला जखम असतानाही आपण तटकरे यांच्यासाठी प्रचार केला, मात्र त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात आपल्याविरोधात गद्दारी केल्याचा आरोपही कदम यांनी केला. "गटार काय असते हे भविष्यात दाखवून देऊ," असा इशाराही त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनाबाबत बोलताना कदम म्हणाले की, राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावर आवाज उठवणे योग्य असून सर्वांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा. भाजपनेही या प्रकरणात भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले. मंडणगड पाणी योजनेबाबतही त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. या योजनेत तटकरे यांचे कोणतेही योगदान नसल्याचा दावा करत, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही योजना मंजूर होण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. "दुसऱ्याच्या बापाला स्वतःचा बाप म्हणून पेढे वाटू नका," असा टोला त्यांनी तटकरे यांना लगावला.



















