Pune Crime : मुलीची जात कुठली? जीव वाचवणाऱ्या तरुणाकडे विचारणा
पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठेत मंगळवारी एका महाविद्यालयीन तरुणीवर एका माथेफिरु युवकाने कोयत्याने हल्ला केला. लेशपाल जवळगे याने माथेफिरु तरुणाचा कोयत्याचा वार अडवला आणि नंतर त्याच्या हातातून कोयता हिसकावून घेतला. त्याच्या या कृतीचे समाजातील सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. मात्र, त्याचवेळी एक चीड आणणारा प्रकारही समोर आला आहे. या हल्ल्याच्या घटनेत मुलीविषयी सहानुभूती व्यक्ती करणे किंवा अशाप्रकारच्या हल्ल्यांविषयी चीड व्यक्त करणे सोडा, पण काही संकुचित विचारसरणीच्या लोकांना जात महत्त्वाची वाटत आहे. या महाभागांनी इन्स्टाग्रामवर लेशपाल याला संबंधित मुलगी कोणत्या जातीची होती, असा प्रश्न विचारला. लेशपाल जवळगे याने या सगळ्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला आहे. लेशपाल याने इन्स्टाग्रामला स्टेटस ठेवून या सगळ्यांना फटकारले होते. त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला DM करुन विचारणाऱ्या सडक्या बुद्धिजीवांनो विनंती आहे की, ते मेसेज डिलीट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता ना समाजाचे, तुमच्या डोक्याला कीड लागली आहे, अशा शब्दांत लेशपालनं आपला संताप व्यक्त केला आहे.























