NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
NCP Merger: शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेने सध्या वेग धरला आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या यासंदर्भात चर्चा आणि बैठका पार पडत आहेत. दोन्ही बाजूचे नेते आपापल्या पक्षश्रेष्ठींना या सगळ्याबाबत माहिती देऊन पुढची रणनीती आखत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार विलिनीकरण (NCP Merger) करुन सत्तेत जायचे किंवा नाही, यावरुन शरद पवार गटात दोन नव्हे तर चार गट पडले आहेत. या प्रत्येक गटाचे मत वेगवेगळे आहे. केवळ आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे सत्तेत जाण्याच्या विरोधात असल्याची माहिती आहे. (Maharashtra Politics news)
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटातील ज्येष्ठ आमदारांचा गट दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करुन सत्तेत जाण्यासाठी आग्रही आहेत. बहुतांश ज्येष्ठ आमदार यासाठी राजी आहेत. आधी अजित पवार (Ajit Pawar) असताना विलिनीकरणाची चर्चा झाली होती, तेव्हा 17 बैठका झाल्या होत्या. विलिनीकरण करायचे असेल तर शरद पवार प्रक्रियेत सक्रिय नसतील , अशी तेव्हाची भूमिका होती. आताही विलिनीकरणाची चर्चा सुरु आहे. एनडीएसोबत सत्तेत जायचं की नाही या निर्णय प्रक्रियेत शरद पवारांचा सहभाग नसेल. एकीकडे वरिष्ठ नेते सत्तेत जाण्यासाठी आग्रही असले तरी रोहित पवार आणि आमदार रोहित पाटील यांचा त्याला विरोध आहे. मात्र, रोहित पाटील यांनी पक्ष विलिनीकरणाबाबत जो अंतिम निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल, असा पवित्रा घेतला आहे.



















