(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suez Canal | कार्गो शिपमुळे सुएज कालवा 'ब्लॉक'; नाशिकच्या द्राक्ष निर्यातदारांनाही फटका
आशिया आणि युरोपला जोडणारा आणि भू-राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणारा इजिप्तचा सुएज कालवा गेल्या चार दिवसांपासून ब्लॉक झाला आहे. सोसाट्याने सुटलेल्या समुद्री वाऱ्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या एका महाकाय कार्गो शीपची दिशा बदलली आणि ते या चिंचोळ्या कालव्यात अडकलं. त्यामुळे या समुद्री मार्गे होणारी वाहतूक थांबली आहे. या घटनेमुळे जगाचे दर तासाला तब्बल 2800 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. इतकच नाहीतर सुएझ कालवा कोंडीचा नाशिकच्या द्राक्ष निर्यातदारांनाही फटका बसला आहे.
नाशिकचे द्राक्ष निर्यातदार राजाराम सांगळे यांचे 25 कंटेनर सध्या सुएझ कालव्यात अडकले आहेत. राजाराम सांगळे यांनी बोलताना सांगितलं की, "आशिया आणि युरोपला जोडणारा हा वन वे कालवा आहे. एका बाजूची ट्रॅफिक थांबली की दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरु होते. दिवसाला या कालव्यातून 60 बोटी पास होत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून सर्वच बोटी येथे अडकल्या आहेत. त्यामुळे आमचे द्राक्षांचे 25 कंटेनर अडकले आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील हजारांहून जास्त असेल. पुढील 3-4 दिवसांत सुरळीत झाले नाही तर अवघड होईल."
"इजिप्तचा सीझन 15 मे रोजी सुरु होतो. उशिरा द्राक्ष पोहोचल्यानं त्याला किंमत मिळणार नाही आणि द्राक्षंही खराब होतील. तसेच एकाच वेळी भरपूर द्राक्ष गेली तर भावही कमी होईल आणि द्राक्षांना कवडीमोल भाव मिळेल. त्यामुळे शिपिंग लाईनसोबत आम्ही सतत संपर्कात आहोत. उद्या रविवारी एक मोठा प्रयत्न होणार आहे. परिस्थिती पूर्ववत झाली नाही तर अवघड होईल. कोरोनाचा आधीच फटका बसलाय, त्यात युरोपमध्ये आधीच आपल्या मालाची किंमत कमी झाली आहे.", अशी चिंताही द्राक्ष निर्यातदार राजाराम सांगळे यांनी व्यक्त केली.