माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांना जामीन मिळणार की यंदा दिवाळी तुरुंगातच?
गेल्या बऱ्याच काळापासून नॉट रिचेबल असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले होते. त्यांनी आपला जबाब ईडीसमोर नोंदवला. तब्बल 13 तास त्यांची चौकशी सुरु होती. अखेर चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नव्हते. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती. अशातच आज अनिल देशमुख स्वतः ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले.