Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
मुंबई : राज्यभरात पावसाने हाहाकार घातला असून मुंबईतही (Mumbai) पावसामुळे (Rain) दुर्घटना घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. तर, मुंबईतील पावसाच्या पहिल्याच दिवशी, गेल्या आठवड्यात महापालिकेचा (BMC) एक अधिकारीच मॅनहोलमध्ये पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा साकीनाका खैरनी रोड येथील मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला. त्याला वाचविण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू होते. मात्र, संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अस्लम शेख असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
मुंबईतील साकीनाका येथील मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा अखेर मृतदेहच हाती लागला आहे. साधारण 45 वर्षांचा व्यक्ती सकाळी 11 च्या सुमारास मॅनहोलमध्ये पडली होती. जवळपास दोन तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.
साकीनाका येथील खैराणी रोड, सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलत असताना एक व्यक्ती पडली. खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचे झाकण उघडे होते. शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल आढळली असून पाण्याचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती वाहून गेली होती. यावेळी महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि संबंधित विभागाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र, संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मॅनहोलमधून व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. दरम्यान, येथील मॅनहोलमध्ये पडलेला व्यक्ती साधारण 45 वर्षांचा असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून त्यास बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.
महापालिका प्रशासन आणि संंबंधित अधिकाऱ्यांवर नेटीझन्सकडूनही रोष व्यक्त होत असून मुंबईच्या पावसात आणखी किती जणांचे जीव जाणार असा सवाल विचारला जात आहे.





















