पिळगावकरांवर कोल्हापूरकर नाराज का? कोल्हापूरचं कलापूर व्हावं या इच्छेमुळे कोल्हापूरकर चिडले?
मुंबई : आज एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मोठी मागणी केली आहे. सचिन पिळगावकरांनी कोल्हापूरचं नाव कलापूर करण्याची मागणी केली आहे. म्हणाले की, कोल्हापूर हे त्या जागेचं नाव कधीच नव्हतं. तिथं चित्रपटसृष्टी होती. तिथं कलावंत होते. सर्व प्रकारचे कलाकार तिथं असायचे. त्यामुळं त्या जागेचं नाव कलापूर होतं. इंग्रजांनी त्या नावाला वेगळ्या पद्धतीनं उच्चारत कोल्हापूर केलं. जसं मुंबईला एवढं नाव चांगलं असताना बॉम्बे केलं. माझी इच्छा आहे की पुन्हा एकदा कोल्हापूरचं नाव कलापूर व्हायला हवं. आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणार, असं सचिन पिळगावकर म्हणाले.
आज प्रेक्षक अत्यंत दक्ष झाले आहेत. आज आपण जी काही कलाकृती करतो ती प्रेक्षकांसाठी करतो. त्यांची पावती मिळाल्याशिवाय काहीच काही. ते जेवढे दक्ष होतील तेवढेच कलाकृती बनवणारी माणसं आपले टूल्स बदलतील. आता काहीही करुन उपयोगाचं नाही कारण प्रेक्षक लगेच पकडतात. हा बदल प्रेक्षकांमध्ये आधी झाला नंतर आमच्यामध्ये बदल झाला. आधी प्रेक्षक सुधरले आणि प्रेक्षकांनी आम्हाला बदलवलं. तरीही चुका आजही घडतच आहेत, असं ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर म्हणाले.
सचिन पिळगावकर म्हणाले की, आज सिनेमा क्षेत्रात अनेक बदल झालेत. आज डिजिटल स्वरुप झालंय पण आधीसारखी मजा नाही. मात्र याचा अर्थ असा नाही नवीन गोष्टींना मी मानत नाही. मला आज 58 वर्ष या क्षेत्रात झाली आहेत. या काळात मी नवीन प्रयोग करत राहिलो. मी अजूनही शिकतो आहे, असंही पिळगावकर म्हणाले.






















