Satara MPG Club Sealed : विशाल अग्रवालला पुन्हा दणका, साताऱ्यातील MPG हॉटेल सील Maharashtra
सातारा : पुण्यामध्ये दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेल्या (Pune Accident) अल्पवयीन मुलाच्या आजोबाचा, सुरेंद्र अगरवालचा (Surendra Agarwal) महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेलमधील बार सील केला आहे. सुरेंद्र अगरवाल यांच्या मालकीच्या बारमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
पुणे अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident) अडचणीत आलेल्या अगरवाल कुटुंबीयांच्या मालकीचे महाबळेश्वरमध्ये पंचतारांकित हॉटेल आहे. हे हॉटेल सरकारी जमिनीवर बेकायदेशीर उभा असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये जर काही अनियमितता असेल तर त्या हॉटेलवर बुलडोझर चालवावा असा थेट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.
बारचा परवाना रद्द
सुरेंद्रकुमार यांच्या नावे असलेल्या महाबळेश्वरमधील बारचा परवाना रद्द करण्यात आला असून तो सील करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलवर धाड टाकली असून त्यामध्ये बार लायसन्सचे उल्लंघन केल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने सातारा जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आणि हा बार सील करण्यात आला.
अग्रवाल कुटुंबाने जर सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधलं असेल तर त्यावर बुलडोझर फिरवा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडिल विशाल अग्रवाल यांना चार दिवसांपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघेही 31 मे पर्यंत पोलीस कोठडी असणार आहे.