Sanjay Raut : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील हल्ल्याचा निषेध हा देशद्रोह कसा
Sanjay Raut Allegation on BJP : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करणं हा देशद्रोहाचा गुन्हा कसा असू शकतो, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्यातही या गुन्ह्याबद्दल आवाज उठवणं गरजेचं आहे. केवळ राजकारणासाठी शिवरायांचा वापर करु नका, असंही भाजपला संबोधून शिवसेना खासदार संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे. देशद्रोह खूप स्वस्त झालेला आहे. या देशात बीजेपी शासित राज्यात काही झालं तरी गुन्हा दाखल होतो, असंही संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, कर्नाटक बेळगावमध्ये आजही महाराष्ट्र एकीकरण समितीचे 38 तरुण तुरुंगात आहेत. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला विटंबना झाली त्यानंतर त्यांनी निषेध केला. गुन्हे दाखल करू शकता?मात्र त्यांच्यावर देशद्रोह गुन्हा दाखल केला जातो. देशात भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे, तिथे देशद्रोह सारखा गुन्हा होऊ शकतो का? देशद्रोहाचा गुन्हा थोडा स्वस्त झाला आहे का? छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे तुम्हाला माहित नाही का? असे सवाल राऊत यांनी केले.