Maharashtra Monsoon Session 2021: खोट्या स्टोऱ्या बनवून आम्हाला निलंबीत केलं : राम सातपुते
मुंबई : विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण तिलकचंद, पराग आळवणी, हरिष पिंपळे, नारायण कुचे, बंटी भांगडीया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या कारवाईनंतर भाजपने बहिष्कार टाकला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी मांडलेल्या ओबीसी समाजाच्या संबंधित ठरावावरुन सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सभागृहातील गोंधळानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढतात. त्यावेळी तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला. तर अशी धक्काबुक्की झालीच नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
या गैरवर्तन करणाऱ्या 12 आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावं असा ठराव अनिल परब यांनी मांडला. या सर्व सदस्यांचे निलंबन एक वर्षांसाठी करण्यात आलं असून त्यांना मुंबई आणि नागपूर विधीमंडळाच्या आवारात एक वर्षे येण्यासाठी बंदी घातली आहे.
मला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली असा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधवांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी गांभिर्याने घेतलं आणि निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला.