Zero Hour : जागावाटपाचा तिढा कायम, मविआ-महायुतीमध्ये नाराजांची फौज | Lok Sabha Election
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अधिसूचना सुद्धा प्रसिद्ध झाली. पण महाराष्ट्रात अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा मात्र सुटलेला नाही. हे कमी की काय? तर आतापर्यंत जाहीर झालेले, काही मनासारखे. काही मनाविरुद्धचे उमेदवार. विद्यमान खासदारांचे तिकीट कापून आयातांना मिळालेली संधी.. हिरावलेले मतदारसंघ.. उर्वरित जागांसाठी मित्रपक्षांत सुरू असलेली रस्सीखेच.. एक वेगळीच राजकीय फौज सध्या दिवसभर कार्यरत दिसतेय. आणि ती फौज आहे नाराजांची. ही नाराजीची लागण राज्यभर पसरलीय. आणि हि नाराजी वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शित होतेय ... अशा मतदारसंघांचा आणि नेत्यांचा सविस्तर आढावा आपण आज घेणार आहोत.
सुरुवात करूया अमरावतीमधून.. भाजपने काल रात्री ह्या आधी अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणांना अमरावतीतून तिकीट दिलं.. आणि आज भाजपप्रवेशही करुन घेतला.. तिकीट नवनीत राणांना मिळणार असे चिन्ह होतेच. त्यामुळे तिकडे महायुतीतले सहकारी... प्रहारचे बच्चू कडू, शिवसेनेचे आनंदराव आणि अभिजित अडसूळ उघडपणे या उमेदवारीविरोधात आधीच उभे राहिले होते. एवढेच नाही तर अगदी भाजपातील काही नेते मंडळी सुद्धा नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये ह्यासाठी भेटीगाठी घेऊन आली. पण तरीही नवनीत राणांचे नाव घोषित झाले. राणांचे इतक्या सगळ्यांशी वैर का? तर त्याला बरीच पार्श्वभूमी आहे. २०१९मध्ये अपक्ष नवनीत राणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या विद्यमान खासदार आनंदराव अडसुळांना हरवून दिल्लीत पोहोचल्या.. तेव्हा पराभूत झालेल्या आनंदराव अडसुळांनी, नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली.. त्यावर सुनावणीही झाली.. कोर्टाने नवनीत राणांना झापलंही.. आता फक्त निकालाची प्रतीक्षाय.. त्याआधी, २०१४मध्ये राणांनी अडसुळांवर विनयभंगाचा आरोप केला होता.. हे झालं राणा विरुद्ध अडसूळ... तिकडे अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा जे नवनीत राणांचे पती आहेत ... यांच्यातील वितुष्ट जुने... राणांना उमेदवारी दिल्याने.. अडसूळ, कडूंनी असहकार पुकारलाय.. पाहूयात.





















