Amar Jyoti Memorial : दिल्लीच्या इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत आज राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलिन होणार
दिल्लीत इंडिया गेटवर 50 वर्षांपासून तेवत असलेली अमर जवान ज्योत आज राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये विलिन करण्यात येणार आहे. अमर जवान ज्योतीचा एक भाग आज राष्ट्रीय युद्ध स्मारकात नेण्यात येणार आहे. तिथं आज दुपारी साडेतीन वाजता दोन्ही ज्योती समारंभपूर्वक विलिन करण्यात येणार आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केलीय. आपल्या वीर जवानांसाठी जी अमर ज्योत तेवत होती, ती आज मालवण्यात येणार आहे, काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाहीत. आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योत पुन्हा तेवत ठेवू, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय. तर सरकारनं त्यांना उत्तर दिलंय. ज्यांनी 7 दशकं राष्ट्रीय युद्ध स्मारक बनवलं नाही, तेच लोक आमच्या शहिदांना स्थायी आणि उचित श्रद्धांजली वाहण्यावरून गदारोळ करत आहेत, असं प्रत्युत्तर सरकारनं दिलंय.






















