EPFO : 18 कोटी 97 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात CBIनं आठ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला
ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील 18 कोटी 97 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयनं आठ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कांदिवली कार्यालयातील 8 कर्मचाऱ्यांनी बनावट दावे करून 18 कोटी 97 लाख रुपये लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयनं चौकशी करून कारवाई केलीय. या आठ कर्मचाऱ्यांना ईपीएफओनं आधीच निलंबित केलंय. ईपीएफओ कार्यालयातील क्लर्क चंदनकुमार सिन्हा हा या प्रकरणातला मास्टरमाईंड आहे. त्यानं अन्य सहकाऱ्यांच्या मदतीनं 2019 ते 2021 या काळात स्थलांतरित कामगारांच्या 817 खात्यांचा वापर करून बोगस दावे केले आणि कोट्यवधी रुपये उकळले. काही मजुरांच्या नावानं पीएफ खातं उघडून त्यानं मुंबईत बंद पडलेल्या २० कंपन्यांचे पीएफचे पैसे काढून घेतल्याचा आरोप आहे.
























