पाणीबाणी

-प्रा. डॉ. प्रशांत भावे
आजची पाण्याची परिस्थिती ही काही नवीन नसावी. दुष्काळ असो अगर अतिवृष्टि, महाराष्ट्र असो किंवा उत्तर प्रदेश, तसेच जगातील विविध क्षेत्र, प्रदेश अश्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आहेत. या आधी सुद्धा अश्या नैसर्गिक आपत्ती आल्या व गेल्या. ही परिस्थिती पण बदलेल. परंतु पूर्वीच्या परिस्थितीं मधे व आत्ताच्या किंवा भविष्यात येणाऱ्या परिस्थितींमधे एक मूलभूत फरक आहे. तो म्हणजे या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा आवाका व त्यांची वारंवारता. ही किंवा या प्रकाराची परिस्थिती जर पुन्हा २-३ किंवा ४-५ वर्षांनी उद्भवली तर. आणि याची शक्यता शास्त्रीय व वैज्ञानिक दृष्ट्या फार आहे. '
कोरोना'चा काळ आपण सर्वांनी बघितला व अनुभवला आहे. पुन्हा जर तशी किंवा तत्सम परिस्थिती उद्भवली तर आपले सर्वांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झालेले नुकसान न आठवणेंच बरे. आपली स्वतःची, देशाची व एकूणच जगाची ३-४ दशकांत झालेली 'अशाश्वत व अतिजलद गती ची प्रगती' याचे कारण आहे व ते शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध व प्रस्थापित झाले व निरंतर होत आहे .
सध्या ज्या विषयाच्या बाबतीत सर्व पातळ्यांवर गहन चर्चा, संशोधन व राष्ट्रीय व जागतिक पातळींवर नियम, नियोजन व नियंत्रण केले जात आहे, तो म्हणजे 'शाश्वत विकास व पर्यावरण बदल'. साधारणपणे २ दशकांपासून या वर लक्ष वेधले जात आहे, परंतू आता तर परिणाम समोर ठाकल्यामुळे, दैनंदिन जीवन च नव्हे तर मुलभुत गरजा ही विस्कळीत व प्रभावित झाल्या आहेत व होत आहे. याचाच अर्थ जर विकास करत असतांना, पाणी, हवा, सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी व कचरा, शहरातील कचरा, जमीन व जंगल यांची सर्व थरांवर योग्य काळजी व कारवाई केली नाही तर, आपण वरील प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जाऊ, व हे टाळणें अशक्य होईल.
आपण आपल्या पुढील पिढीच्या (मुलं व नातवंडासाठी) वापरासाठी लागणारे कमीत कमी पाणी, हवा, जमीन तरी त्यांच्या साठी सोडावी. आपल्या मुलं, नातवंडासाठी साठी घर, दार, संपत्ती, या पेक्षा ही सर्वात जास्त गरजेची बाब वरील आहे. घर, संपत्ती, तर ते ही करू शकतील, किंबहुना तुमच्या पेक्षा चांगलं करू शकतील. तुम्ही पण केलेत की. पण जगण्यास लागणारे कमीतकमी पाणी, हवा, जमीन, जंगले इत्यादी हे त्यांच्या साठी नाही सोडले तर येणारी पिढी, या आजच्या पिढीला, कधीही माफ करणार नाही. यालाच 'शाश्वत विकास' असे म्हणतात.
या संदर्भात आता सर्व स्तरातील शिक्षणात, नवीन शिक्षण पद्धती मधे आमूलाग्र बदल केलेत. शालेय ते उच्च शिक्षण, सर्वच आता या विषयावर, म्हणजे 'शाश्वत विकास व पर्यावरण बदल' या वर भर देत आहे, हा विषय, त्यांच्या पाठ्यक्रमाचा भाग आहे. अभियांत्रिकी शिक्षणाच्या सर्व स्तरांवर (पदविका, पदवी व पदव्युत्तर), अभियांत्रिकी च्या सर्व शाखांना, ह्या विषयाचे शिक्षण सक्तीचे केले व करत आहे.
नोकरी साठी अभियंताच्या निवड व नियुक्ती प्रक्रियेत सुद्धा या विषयातील ज्ञान, हे त्यांच्या निवडी साठी एक अत्यंत जमेची बाजू ठरतेय, त्यांच्या निवडीच्या अभियांत्रिकी विषयाच्या बरोबरीने किंवा वरचडच. ( बिग फोर व जगातील नामवंत औद्योगिक कंपन्या, या वर भर देतात). भारतीय शेयर मार्केट मधील प्रथम १००० कंपन्यांना BRSR (Business Responsibility and Sustainability Reporting) हा एक महत्त्वाचा भाग आहे. हा रिपोर्ट फायनेंशियल आडिट इतकाच महत्त्वाचा आहे व तितक्याच प्रामुख्या ने आडिट करावा लागतोय. कुठल्याही प्रकारची खोटी अगर चुकीची माहिती कंपनी ला जमीनदोस्त करू शकते व म्हणूनच त्यास भरपूर महत्व आहे.
सरकार व सरकारी खाते यांच्या सर्वच प्रकल्पांना पर्यावरणीय मंजुरी ची चाचणी व स्वीकृती गरजेची असते व ती प्राप्त करणें, कठीण ही असते. भारत सरकारचे २०७० च्या 'कार्बन मुक्त नेट झीरो' भारत ही 'वातावरणीय बदल' च्या जागतिक धोरणाचा भाग आहे. वातावरणातील कार्बन हे, पर्यावरण बदला चे प्रमुख कारण असल्यामुळे त्यावर ताबा मिळवणें हे, महत्वपूर्ण आहे. आपण सर्वच, पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहोत. पाणी ही आपली सर्वांची मूलभूत गरज़ आहे, तसेच ती पुढच्या पिढ्यांसाठी पण महत्वाची आहे.
आपण सर्वांनी मागील काही दशकांत विविध प्रकारे पर्यावरणाची अतोनात अवहेलना व हानी केली आहे, त्याचे परिणाम आता तीव्रतेने व उग्रते ने समोर येत आहेत. बघा, आपण काही करू शकलो तर, नाही तर........ प्रसिद्ध मराठी कवी केशवसुतां च्या कवितेतील "सावध, ऐका पुढच्या हाका", हे आजच्या परिस्थिति चे सारांश.........
























