Zero Hour Full : एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी ते राष्ट्रवादीत मनोमिलन? ; सविस्तर चर्चा
नमस्कार मी विजय साळवी... एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झीरो अवरमध्ये आपलं स्वागत...
मंडळी, भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजच्या दिवसाची विशेष नोंद करण्यात येईल... कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं देशातल्या निवडणुकांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय... हा निर्णय येणाऱ्या काळात, प्रत्येक राज्य, प्रत्येक राजकीय पक्ष, आणि प्रत्येक राजकीय नेत्याच्या कारकीर्दीवर इम्पॅक्ट करणारा ठरणार आहे.... पण फक्त राजकीय पक्ष आणि राजकीय नेतेच नाही तर देशातल्या करदात्यांच्या दृष्टिकोनातूनही हा एक मोठा निर्णय आहे...
आणि मंडळी हा निर्णय आहे.. एक देश एक निवडणुकीसंदर्भातला... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील कॅबिनेटनं एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी दिलीय.. खरं तर सप्टेंबर महिन्यातच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीनं सादर केलेला अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वीकारला होता.. त्यातल्या अनेक शिफारशींवर चर्चाही झाली होती.. आणि आज त्याच अहवालावरील विधेयकाला मोदी कॅबिनेटनं मंजुरी दिलीय.
मंडळी, २०१४ साली नरेंद्र मोदी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले... त्यांनी सत्तेत आल्यापासून आजपर्यंत... जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असतानाच... भाजपचा जाहीरनामा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर असलेल्या प्रत्येक बाबीची पूर्तता करण्याचे प्रयत्न केलेत.. जाहीरनाम्यातील घोषणा पूर्णत्वास नेल्या आहेत.. उदाहरणंच सांगायची तर जीएसटी, ट्रिपल तलाक, कलम तीनशे सत्तरसारखे वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेले प्रश्न मोदी सरकारनं सोडवले आहेत.. त्याच यादीत आता समान नागरी कायदा आणि एक देश, एक निवडणूक.. या विधेयकांचा समावेश होतो.
त्या दोनपैकी एक देश, एक निवडणूक हा मुद्दा बहुतेक मार्गी लागताना दिसतोय.. त्याची सुरुवात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झाली होती.. तेव्हा मोदींच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या टर्मचे अवघे काही महिने उरले होते.. त्यात सप्टेंबर 2023 मध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली मोदी सरकारनं एक समिती स्थापन केली... आणि त्यांच्यावर जबाबदारी दिली.... 'वन नेशन वन इलेक्शन' चा अभ्यास करून त्याबाबत शिफारशी करण्याची...
कोविंद समितीनं काम सुरु केलं.. आणि त्याच संदर्भातला तब्बल 18 हजार 626 पानांचा अहवाल त्यांनी राष्ट्रपतींना सादर केला.. त्याआधी समितीच्या तब्बल 65 बैठका झाल्या.. समितीनं सोळा भाषांच्या 105 वृत्तपत्रांमध्ये याबाबत जाहिराती दिल्या.. आणि लोकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या.... त्यांचं विश्लेषण केलं.. आणि निवडणुकीचं नवं मॉडेल सादर केलं.. त्यालाच आज मोदींच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली...
संसदेच्या सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून याच विधेयकासंदर्भात चर्चा होती.. त्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.. इतकंच नाही तर याच अधिवेशनाच्या काळात हे विधयेक संसदेत मांडण्याचीही तयारी सरकारनं केल्याचं समजतं.. मंडळी.. यासह अनेक गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत.. पण, सुरुवातीला पाहुयात खुद्द पंतप्रधान मोदींनी यावर काय वक्तव्य केलं होतं...
तुम्ही पाहाताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर.
मंडळी, शिवसेनेपाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि महाराष्ट्रात दुसरा भूकंप झाला. अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट महाविकास आघाडीतून सत्ताधारी महायुतीत सामील झाला होता. हा सारा घटनाक्रम आणि त्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालं तो इतिहास तुम्हालाही एव्हाना तोंडपाठ झाला असावा.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या या फुटीचे पडसाद केवळ राज्याच्या राजकारणात उमटतील असं वाटलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवली आणि पवार कुटुंबीयांमध्येही उभी फूट पडली. लोकसभा निवडणुकीत नणंद भावजय म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं वादाच्या ठिणग्याही उडाल्या.
मग विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयांमधल्या राजकीय दुहीचा दुसरा अंक पाहायला मिळाला. अजित पवार आणि युगेंद्र पवार या काकापुतण्याच्या लढाईनं पवार कुटुंबीयांची दिवाळी वेगवेगळी साजरी झाली. शरद पवार यांच्यासोबतच्या पवार कुटुंबीयांनी बारामतीच्या गोविंदबागेत दिवाळी साजरी केली, तर अजितदादांसोबतच्या पवार कुटुंबीयांनी काटेवाडीत दिवाळीचा आनंद लुटला.
या साऱ्या घडामोडी अवघ्या महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यांनी पाहिल्यायत. पण तरीही आम्ही त्या पुन्हा सांगतोय याचं कारण शरद पवारांच्या ८४व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेली त्यांची भेट. आणि विशेष म्हणजे काका-पुतण्याच्या या भेटीच्या निमित्तानं केवळ पवार कुटुंबच नाही, तर राष्ट्रवादीचा परिवारही दिल्लीतल्या सहा जनपथवर एकवटला होता.
अजित पवारांसह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीही शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या जुन्या सहकाऱ्यांनीही थोरल्या पवारांचं अभिष्टचिंतन केलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दहा दिवसांआधीही शरद पवारांची भेट घेतली होती. शरद पवारांच्या दिल्लीतल्या सहा जनपथ या निवासस्थानी ही भेट झाली होती. विशेष म्हणजे अजित पवार दिल्लीत असतानाच ही भेट झाली होती. पण या दोन भेटींची सध्या तरी सांगड घालता येत नाहीय
कारण शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आज झालेली भेट ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी आणि यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या परंपरा आणि आदर्शांचं पालन करणारी होती, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.