Sassoon Doctors in Pune Car Case Special Report :ब्लड सँपल कचऱ्यात फेकले, ससूनची 'कसून' चौकशी करणार?
Pune Porsche Car Accident :पुण्यातील कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री भरधाव पोर्श कारखाली दोघांना चिडून मारल्यानंतर बिल्डर विशाल अग्रवालने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी केलेल्या कारनाम्यांचा उलघडा आता होऊ लागला आहे. पोलिस तपासामध्ये दिवसागणिक अग्रवाल फॅमिलीने केलेल्या कृष्णकृत्यांचा आता भांडाफोड होत आहे. पहिल्यांदा या प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता ते थेट ससून रुग्णालयामध्ये ब्लड सॅम्पल बदलून कचऱ्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयाचा फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी पैशाच्या बदल्यात ब्लड सॅम्पल बदलून कचऱ्यात फेकून दिल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. त्यामुळे ससून रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. इतकेच नव्हे, तर हा ब्लड सॅम्पल कचऱ्यामध्ये जाण्यासाठी विशाल अग्रवालने अजय तावरेशी संपर्क केल्याचे तांत्रिक पुराव्यातून उघड झालं आहे. आता या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
विशाल अग्रवाल आणि डॉक्टरांमध्ये पैशांची दिवाण-घेवाण
ब्लड सॅम्पल कचऱ्यामध्ये जाण्यासाठी विशाल अग्रवाल आणि डॉक्टरांमध्ये पैशांचे दिवाण-घेवाण सुद्धा झाली होती. वडगाव शेरीतून 3 लाख रुपये स्विफ्ट कारमधून घेऊन येणाऱ्या ससूनमधील शिपायाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. अमित घटकांबळे असं त्याचं नाव असून तो ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन विभागामध्ये शिपाई म्हणून काम करतो. त्यामुळे पैशांच्या बदल्यांमध्ये ससूनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल थेट कचऱ्यामध्ये टाकून दिल्याचे स्पष्ट झालं आहे.
अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल रिपोर्ट मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अपघात घडल्यानंतर येरवडा पोलिस स्टेशनमध्ये पहिल्या दिवशी घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुद्धा पुणे पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली. या प्रकरणात देशव्यापी संताप उसळून आल्यानंतरपुणे पोलिसांनी या प्रकरणात तपासाचे सूत्रे फिरवली होती. यानंतर अग्रवाल फॅमिलीमधील विशाल आणि सुरेंद्र कुमारच्या अटकेची कारवाई झाली होती. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.