Ajit Pawar Special Report : सत्तेचा सारीपाट, अजितदादांच्या नावे पुन्हा एक नवी पहाट?
Maharashtra Politics Ajit Pawar: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठी खळबळ होणार असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता आणखी एका दाव्याने खळबळ उडाली आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पायउतार होणार असून राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) हे सूत्रे हाती घेणार असल्याचे वृत्त 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) एक गट भाजपसोबत सत्ता स्थापन करणार आहे. मात्र, या आघाडीला शरद पवार यांनी आपला पाठिंबा दिला नाही. 2019 मध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ता स्थापनेचा प्रयोग फसला होता. त्यावेळी 80 तासांचे सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा अजित पवार हे सक्रीय झाल्याची चर्चा सुरू असताना हे वृत्त समोर आले आहे. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत्या काही दिवसात येण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची घाई असल्याचे वृत्तात म्हटले आहे.