Facebook & Instagram : ट्विटर कंपनीच्या पाऊलावर पाऊल ठेवत आता मेटा (Meta) कंपनीनंही पेड व्हेरिफिकेशन सुविधा सुरु केली आहे. ट्विटरप्रमाणेच तुम्ही आता फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरही तुम्ही पैसे देऊन ब्लू टिक मिळवू शकता. मेटा कंपनीनं भारतातही आता पेड व्हेरिफिकेशन सेवा (Meta Paid Subscription) सुरु केली आहे. त्यामुळे आता तुम्ही पैसे देऊन तुमच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्लू टिक मिळवू शकता. ट्विटप्रमाणेच मेटा कंपनीने ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे कंपनीला व्यवसायात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
मेटा कंपनीकडून पेड व्हेरिफिकेशन सेवा सुरु
भारतापूर्वी मेटा कंपनीने इतर अनेक देशांमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्ससाठी ही पेड व्हेरिफिकेशन सेवा सुरू केली आहे. आता कंपनीने पेड व्हेरिफिकेशन भारतातही लाँच केलं आहे. सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटर ब्लू पेड सबस्क्रिप्शन सुरू केल्यानंतर आता मेटा कंपनीनं आपल्या दोन लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पेड सबस्क्रिप्शन सुरु करत अधिक उत्पन्न मिळवण्याची योजना आखली आहे.
फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ब्लू टिक सशुल्क
आता भारतातील फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्संना अकाऊंटवरली ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ब्लू टिक्ससाठी यूजर्सला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. मेटाने अमेरिकेमध्ये ब्लू टिकसाठी प्रति महिना 14.99 डॉलर म्हणजे अंदाजे 1,233 रुपये शुल्क आकारलं आहे. भारतात ही किंमत थोडी वेगळी आहे.
मेटा पेड व्हेरिफिकेशनसाठी शुल्क किती?
मीडिया रिपोर्टनुसार, वेब व्हर्जनसाठी युजर्सनं 599 रुपये मासिक शुल्क (Monthly Subscription) भरावं लागंल. मेटा ने म्हटले आहे की, भारतातील युजर्स सध्या पेड व्हेरिफिकेश सुविधेसाठी iOS आणि Android वर 699 रुपये शुल्क भरून पेड सबस्क्रिप्शन घेऊ शकतात.
आधीपासून ब्लू टिक असलेल्या अकाऊंटचं काय होणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीनं म्हटलं आहे की, यामुळे क्रिएटर्सना Instagram किंवा Facebook वर त्यांची कम्युनिटी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत होईल. यापूर्वी ज्या खात्यांना ब्लू टिक मिळालं आहे, त्या अंकाऊंटमध्ये कोणताही बदल होणार नाही.
पेड व्हेरिफिकेशनचा फायदा काय?
व्हेरिफाईड अकाउंटला सुरक्षा मिळेल, असं मेटा कंपनीनं सांगितलं आहे. मेटा कंपनीने पेड व्हेरिफिकेशनबाबत सांगताना म्हटलं आहे की, "जगभरातील अनेक देशांमध्ये आमच्या सुरुवातीच्या चाचणीचे उत्तम परिणाम पाहिल्यानंतर आम्ही मेटा व्हेरिफाईड सेवेचा भारतातही विस्तार करत आहोत."