AI Cameras Become Operational In Keral : केरळमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय चांगलाच यशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे. केरळमध्ये AI आधारीत कॅमेरे लावण्यात आल्याने रस्ते अपघाताचे प्रमाण कमी झाले असल्याचे समोर आले आहे. केरळ सरकारचे परिवहन मंत्री अँटनी राजू यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नव्या  टेक्नाॅलाॅजीचा वापर करून राज्यात अपघाताचे (Accident) प्रमाण कमी झाले आहे. 'सेफ केरळ' (Safe keral) हा एक प्रकल्प काही दिवसांपूर्वी तयार करण्यात आला होता. त्याचा एक भाग म्हणून AI कॅमेरे लावण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.  


त्यांनी  पुढे म्हटले की, 5 ते  8 जून दरम्यान  3,52,730 एवढ्या संख्येने वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. तसेच वाहतूक देखरेख प्रणालीवर आतापर्यंत अशी 19,790 प्रकरणे आढळून आली आहेत. मोटार विभागाने नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 10,457 प्रकरणात चलान लागू केले असल्याची माहिती त्यांनी दिली. केरळमध्ये दररोज सरासरी 12 रस्ते अपघात होतात आणि या अपघातात अनेकांचे मृत्यु होतात. मात्र  AI कॅमेरे बसवण्यात आल्यानंतर अपघातांची संख्या 5 ते 8 पर्यंत खाली आली असल्याची माहिती त्यांनी दिली.


सरकारने  1 सप्टेंबर पासून अवजड वाहने चालवणाऱ्यांना तसेच पुढील सीटवरील प्रवाशांना सीट बेल्ट (Seat Belt) लावणे बंधनकारक केले आहे.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांपैकी 7,896 प्रवाशी असे होते, जे सीट बेल्ट न लावता प्रवास करीत होते. 6,153 लोक हे हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत होते आणि 715 जण दुचाकीवरील सहप्रवासी होते.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये व्हीआयपी गाड्यांसह 56 सरकारी वाहनांचा समावेश होता. नियमांचे उल्लंघन करणारी वाहने कॅमेऱ्यात कैद झाली, त्यानंतर कारवाई सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली. परिवहन मंत्री अँटनी राजू म्हणाले की, मनुष्यबळ वाढविण्यासह वाहतूक देखरेख प्रणालीमध्ये आढळलेल्या उल्लंघनांची नोंद करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढविण्याचे निर्देश केल्ट्रॉनला (Kerala State Electronics Development Corporation-KELTRON) देण्यात आले आहेत. या झालेल्या संपूर्ण बैठकीत वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.


एप्रिलमध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यापासून काँग्रेस (Congress) 'सेफ केरळ' प्रकल्पावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, ज्याचा उद्देश केवळ राज्यातील रस्ते अपघात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी करणे एवढाच आहे.  232 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर दोन महिन्यांनंतर, 5 जून रोजी कॅमेरा केरळात लावण्यात आले. केरळने 2020 मध्ये केल्ट्रॉनशी याबाबत करार केला होता. या वर्षी एप्रिलमध्ये मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी 'सेफ केरळ' प्रकल्पाचे उद्घाटन केले , ज्यावेळी AI कॅमेरे रस्त्यांवर लावण्यात आले. राज्यातील रस्ते अपघात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी करण्यासाठी हा अनोखा उपक्रम करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


मोठी बातमी! बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा, कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा; येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार