Sam Altman about India : OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन (Sam Altman) काही दिवसांपूर्वी भारत (India) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची भेट घेतली. तसेच, भारतीयांनी ChatGPT ला प्रोत्साहन दाखवल्याबाबत कौतुकही केलं. पण या सोबतच त्यांनी भारतीयांना एक नवं आव्हान दिलं आहे. चॅटजीपीटीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी भारतीयांनी कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) मध्ये भारत अमेरिकेची बरोबरी करु शकत नाही, असं अल्टमन यांनी म्हटलं आहे.
'भारत अमेरिकेची बरोबरी करु शकत नाही'
सॅम अल्टमन यांनी म्हटलं आहे की, भारतीय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (Artificial Intelligence) बाबतीत अमेरिकन कंपन्यांसोबत स्पर्धा करु शकत नाही. गुगल इंडिया आणि दक्षिण पूर्व आशियाचे उपाध्यक्ष राजन आनंदन यांच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राजन आनंदन यांनी सॅम अल्टमन यांना विचारलं की, भारत ChatGPT सारखं AI टूल बनवू शकतो का? यावर अल्टमन यांनी म्हटलं की, AI ज्या पद्धतीने काम करते, त्यामध्ये तुम्ही आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही. भारतीय ट्रेनिंग फाउंडेशन मॉडल्स देखील वापरून पाहू शकणार नाही आणि तरीही प्रयत्न करणं तुमचं काम आहे.
टेक महिंद्राच्या सीईओंनी स्वीकारलं आव्हान
दरम्यान, सॅम अल्टमन यांनी भारत आणि भारतीयांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत भारतीयांना जणू आव्हान दिलं आहे. यानंतर टेक महिंद्राच्या सीईओंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. टेक महिंद्राचे सीईओ सीपी गुरनानी यांनी ट्विट करत सॅम अल्टमन यांचं आव्हान स्वीकारलं आहे. राजन आनंदन यांनीही सॅम अल्टमन यांना मुलाखतीत उत्तर देताना म्हटलं की, भारताच्या 5000 वर्षांच्या उद्योजकतेच्या इतिहासानं हे दाखवून दिले आहे की, भारतीय उद्योजकांना कमी लेखू नये.
सॅम अल्टमन यांचं भारतीयांना आव्हान
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) च्या मुद्द्यावर भारताला आव्हान देऊन सॅम अल्टमन यांनी भारतीयांसमोर नवं आव्हान उभं केलं आहे. इतिहास साक्ष आहे की, भारतासमोर जेव्हा-जेव्हा अशी आव्हानं आली तेव्हा भारताने सर्वोत्तम कामगिरी करत या आव्हनांवर मात केली आहे. भारताने अनेक बाबतीत जागतिक पातळीवर आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. UPI हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. अनेक देश आता UPI चा वापर करण्यावर भर देत आहेत.