Meta Layoffs: आयटी आणि टेक कंपन्यांमध्ये मंदीसदृष्य परिस्थिती आली असल्याचं चित्र असून त्यामुळे अनेक कंपन्यांनी कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कर्मचारी कपातीचा मार्ग स्वीकारल्याचं दिसून येतंय. मेटा कंपनीनेही आता 10,000 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला असून या कर्मचाऱ्यांना तशा नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मेटाने ही घोषणा मार्चमध्येच केली होती. आतापर्यंत जवळपास 5,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवर न येण्याचे ई-मेल पाठवण्यात आल्याची माहिती आहे. 


गेल्या काही काळात जगातील अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाने तिच्या विविध प्लॅटफॉर्मवर आणखी 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी मेटाने नोव्हेंबर 2022 मध्ये 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते, जी संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या 13 टक्के इतकी होती.


या कर्मचारी कपातीनंतर मेटामधील कर्मचाऱ्यांची संख्या 2021 सालच्या मध्यापर्यंत जितकी होती, तितकी होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कंपनीने मोठी नोकरभरती केली होती. मेटा कंपनीने आता प्रोफेशनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म LinkedIn च्या माध्यमातून या कपातीची माहिती दिली आहे. 


डिस्ने 4 हजार कर्मचाऱ्यांना काढणार 


त्याचप्रमाणे अमेरिकेतील दिग्गज मास मीडिया आणि मनोरंजन कंपनी वॉल्ट डिस्नेनेही टाळेबंदीची दुसरी फेरी सुरू केली आहे. या फेऱ्यात सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील. या वर्षाच्या सुरुवातीला डिस्नेने 7,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते.
 
टेक कंपन्यांमध्ये मोठी नोकरकपात


आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर टेक कंपन्यांनी यावर्षी मोठी नोकरकपात केली आहे. अॅक्सेंचर (Accenture), अॅमेझॉन (Amazon), मेटा (मेटा) आणि इतर टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपातीच्या घोषणा केल्या आहेत. अॅमेझॉनने 27 हजार, मेटाने 21 हजार, अॅक्सेंचरने 19 हजार, मायक्रोसॉफ्ट 10 हजार, अल्फाबेट 12 हजार, सेल्फफोर्स 8 हजार, एचपी 6 हजार, आयबीएम 3 हजार 900, ट्विटर 3 हजार 700 आणि सेगागेट कंपनीने 3 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. 


टेक कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्प (IBM) सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे  AI वर काम करत असून नवीन नोकर भरती थांबवण्यात आहे. कंपनीचे सीईओ अरविंद कृष्णा यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत कंपनीची ही योजना स्पष्ट केली. अरविंद कृष्णा म्हणाले होते की, कंपनीमध्ये सध्या सुमारे 26,000 कामगार हे अक्रियाशील भूमिकेत आहेत. मला दिसत आहे की पुढील 5 वर्षांत 30 टक्के कर्मचारी एआय आणि ऑटोमेशनद्वारे बदलले जातील. याचा अर्थ IBM सुमारे 7800 कर्मचाऱ्यांना कमी करून त्या ठिकाणी AI चा वापर करू शकते.


ही बातमी वाचा: