एलॉन मस्क Twitter विकणार? म्हणाले, "आतापर्यंतचा प्रवास खूपच वेदनादायी"
Elon Musk : एलॉन मस्क यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ट्विटर त्यांच्यासाठी खूप वेदनादायी आहे.
Elon Musk on Twitter : एलॉन मस्क (Elon Musk News) यांनी ट्विटर विकत घेतल्यापासूनच चर्चेत आहेत. तुम्हाला काय वाटतं? एलॉन मस्क यांनी ट्विटर (Twitter) विक घेतल्यानंतर ते आनंदी आहेत की, दु:खी? तसं पाहायला गेलं तर त्यांच्या बोलण्यावरुन ते अत्यंत कठिण काळातून जात असल्याचं दिसत आहे. एलॉन मस्क यांनी नुकतीच बीबीसीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना मस्क यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत एलॉन मस्क यांना एक प्रश्न विचारला. ट्विटर विकत घेतल्याबाबत कधी खेद वाटतो का? असा प्रश्न एलॉन मस्क यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना एलॉन मस्क म्हणाले की, ट्विटर माझ्यासाठी खूपच वेदनादायी ठरलंय. ट्विटरचा अनुभव अजिबात सुखद नव्हता. तसेच, हे कंटाळवाणंही नाही, पण जेव्हापासून ट्विटरची मालकी घेतलीये, तेव्हापासून रोलरकोस्टर राईडसारखा अनुभव येतोय.
ट्विटर अन् एलॉन मस्क
एलॉन मस्क यांनी मुलाखतीत बोलताना सांगितलं की, ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांच्या वेदनांची पातळी खूपच जास्त आहे. परंतु, अब्जाधीश एलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर खरेदी करण्याच्या निर्णयाचं समर्थनही केलं आहे. एलॉन मस्क म्हणाले की, "ट्विटर ताब्यात घेणं ही योग्य गोष्ट होती", असं त्यांना वाटतं. ट्विटर विकत घेण्याचा त्यांचा निर्णय योग्यच होता, असंही एलॉन मस्क म्हणाले. अब्जाधीशांना त्यांच्या निर्णयाचा कोणताही पश्चाताप नाही. पण हेच एलॉन मस्क ट्विटर डील त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरल्याचंही मान्य करतात.
ट्विटरमधील नोकर कपातीबाबत काय म्हणाले मस्क?
गेल्या काही दिवसांपासून ट्विटरमधून अनेकांना नारळ देण्यात आला आहे. नोकरकपातीमुळेही काही दिवसांपूर्वी ट्विटर चर्चेत आलं होतं. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत एलॉन मस्क यांनी याबाबतही वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, ट्विटरच्या 80 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणं सोपं नव्हतं. सोशल मीडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 8,000 वरून 1,500 पर्यंत कमी करण्यात आली आहे. या मुलाखतीत एलॉन मस्क यांनी त्यांना कोणाशीही वैयक्तिकरित्या संवाद साधण्याचा वेळ मिळाला नाही, त्यामुळेच त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ईमेल करुन काढून टाकण्यात आल्याचं कळवल्याचं सांगितलं.
एलॉन मस्क ट्विटर विकणार का?
एलॉन मस्क यांनी सांगितलं की, कामाचा ताण इतका आहे की, ते कधी कधी ऑफिसमध्येच झोपतात. झोपण्यासाठी लायब्ररीत असलेल्या सोफ्याचा ते आधार घेतात. एलॉन मस्क यांनी असंही म्हटलंय की, त्यांना वाटतं की, त्यांनी रात्री ट्वीट करणं टाळावं. यामागील कारण विचारल्यावर ते म्हणाले की, माझ्या ट्वीट्समुळे मी अनेकदा स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. त्यामुळेच तीन वाजल्यानंतर मी ट्वीट करुच नये, असं मला वाटतंय. महत्त्वाचं म्हणजे, याच मुलाखतीत बोलताना ट्विटरबाबत एलॉन मस्क यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ट्विटर विकत घेण्याच्या आपल्या निर्णयाचं समर्थन करताना मस्क यांनी असंही म्हटलं की, जर त्यांना ट्विटरसाठी योग्य व्यक्ती सापडली तर ते ट्विटर विकून टाकतील.