T20 World Cup 2022: भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. सर्वात प्रथम पाकिस्तान आणि त्यानंतर नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतकीय खेळी करणाऱ्या विराटनं त्याची उत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणना का केली जाते? हे दाखवून दिलं. बांग्लादेशविरुद्ध एडिलेड येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषकातील भारताच्या चौथ्या सामन्यात विराटनं खास विक्रमाला गवसणी घातलीय. विराटनं श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धनेच्या डोक्यावरचा ताज हिसकावून टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय.
ट्वीट-
अवघ्या 23 इनिंगमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठला
टी-20 विश्वचषकातील सुपर 12 फेरीतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं इतिहास रचलाय. विराट कोहली त्याच्या टी-20 कारकिर्दीतील पाचवा टी-20 विश्वचषक खेळत आहेत. टी-20 विश्वचषकातील अवघ्या 23 इनिंगमध्ये त्यानं 1000 धावांचा टप्पा गाठला. याशिवाय, त्यानं महेला जयवर्धनेचा सर्वाधिक धावांचा विक्रमही मोडलाय. टी-20 विश्वचषकातील इतिहासात महेला जयवर्धनेनं 31 डावात 1 हजार 16 धावा केल्या होत्या. या दरम्यान, विराटच्या बॅटमधून 12 अर्धशतकं झळकली आहेत. विराटनं 2012 मध्ये पहिला टी-20 विश्वचषक खेळला. ज्यात त्यानं 185 धावा केल्या. त्यानंतर 2014 आणि 2016 च्या टी-20 विश्वचषकात विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. टी-20 विश्वचषकात सर्वाधिक दोन वेळा सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूचा खिताब जिंकणारा विराट एकमेव खेळाडू आहे.
विराटची टी-20 विश्वचषकातील जबरदस्त कामगिरी
विराट कोहलीनं यंदाच्या टी-20 विश्वचषकाची सुरुवात 845 धावांपासून केली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 धावांची खेळी करण्यापूर्वी त्यानं पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी केली. या कामगिरीसह त्यानं तिलकरत्ने दिलशान (897 धावा), रोहित शर्मा (921 धावा) आणि ख्रिस गेल (965 धावा) यांना मागं टाकून टी-20 विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्यानं जयवर्धनेचा विक्रम मोडला.
हे देखील वाचा-