Imran Khan on PAK vs ENG Final : टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर (ENG vs PAK) 5 गडी राखून विजय मिळवत विश्वचषक उंचावला आहे. दरम्यान सामन्यात पाकिस्तानने देखील इंग्लंडला कडवी झुंज दिली. पण पाकिस्तानने दिलेलं 138 धावाचं आव्हान फारच माफक असल्यानं अखेर त्याला पराभव पत्करावा लागला. दरम्यान या पराभवानंतर सर्वच पाकिस्तानी कमालीचे निराश असून पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'पाकिस्तानकडे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहेत. पण शाहीन आफ्रिदीचं सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त होणं संघाला महाग पडलं...'


टी20 विश्वचषक 2022 च्या फायनलमध्ये पाकिस्तान संघाच्या पराभवानंतर इम्रान खान म्हणाले, ''मी खूप दिवसांनी क्रिकेट पाहिलं. सध्या पाकिस्तानकडे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहेत. आमचा संघ सध्या जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. पण अंतिम सामन्यात शाहीनच्या दुखापतीमुळे संघाला अडचण सहन करावी लागली.' तसंच पुढे बोलताना खान म्हणाले, 'मी संघाला नेहमी सांगतो की आपण सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत लढले पाहिजे आणि यावेळीही आमच्या संघाने तेच केले. मला माहित आहे की सध्या पाकिस्तानची जनता पराभवाच्या धक्क्यातून जात आहे. जिंकणे आणि हरणे हा खेळाचा भाग आहे. शाहीन आफ्रिदी चांगला खेळत होता. पाकिस्तान संघ ज्या प्रकारे अंतिम फेरीत पोहोचला त्याबद्दल त्याचं अभिनंदन.'


ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) खेळवला गेलेला हा पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड टी20 विश्वचषक स्पर्धेतील फायनलचा सामना एक लो स्कोरिंग मॅच असूनही चुरशीची असल्याचं पाहायला मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवत अवघ्या 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे 138 धावाचं आव्हान गाठताना इंग्लंडला अवघड झालं. पण त्याचवेळी त्यांचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने एकहाती झुंज देत नाबाद 52 धावा करत 5 गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला. या विजयासह 2010 नंतर पुन्हा एकदा इंग्लंडनं टी20 विश्वचषक जिंकला.


हे देखील वाचा-