T20 WC 2022 Prize Money: विश्वचषक उंचावणाऱ्या इंग्लंड संघाला 13 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. तर उप विजेत्या पाकिस्तानला संघाला 6.5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. मेलबर्न मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव करत टी 20 विश्वचषकावर नाव कोरलं होतं. बेन स्टोक्स आणि सॅम करन यांच्या भन्नाट खेळीच्या बळावर इंग्लंडने दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. T20 World Cup 2022 संकेतस्थळावर टी 20 विश्वचषकात सामील झालेल्या संघाला मिळणाऱ्या बक्षीसाची माहिती देण्यात आली आहे.
T20 World Cup 2022 संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाला 1.6 मिलियन डॉलर म्हणजेच 13.18 कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या पाकिस्तान संघाला 6.59 कोटी रुपये मिळणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या भारत आणि न्यूझीलंड संघालाही बक्षीस मिळणार आहे. रोहित शर्मा आणि केन विल्यमसन यांच्या संघाला प्रत्येकी 3.29 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.
सुपर 12 स्टेजमधून बाहेर गेलेल्या आठ संघाला प्रत्येकी 70,000 डॉलर (57.65 लाख रुपये) मिळणार आहेत. तसेच सुपर 12 स्टेजमध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला 40,000 डॉलर (32.95 लाख रुपये) मिळणार आहेत. सुपर 12 स्टेजमध्ये 30 सामने झाले आहेत. त्याशिवाय पहिल्या राऊंडमध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला 40,000 डॉलर (32.95 लाख रुपये) मिळणार आहेत. पहिल्या फेरीत 12 सामने झाले आहेत.
बक्षीसांची संपूर्ण यादी:
संघ | बक्षीस | भारतीय चलनानुसार |
विजेता | 1.6 मिलियन डॉलर | जवळपास 13.18 कोटी |
उप- विजेता | 0.8 मिलियन डॉलर | जवळपास 6.59 कोटी |
सेमीफायनलमध्ये पराभूत झालेला संघ | 0.4 मिलियन डॉलर | जवळपास 3.29 कोटी |
सुपर-12 मध्ये प्रत्येक सामना जिंकणारा संघ | 40 हजार डॉलर | जवळपास 33.95 लाख |
सुपर-12 मधून बाहेर पडणारा प्रत्येक संघ | 70 हजार डॉलर | जवळपास 57.65 लाख |
पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ | 40 हजार डॉलर | जवळपास 32.95 लाख |
पहिल्या फेरीतून बाहेर पडलेला संघ | 40 हजार डॉलर | जवळपास 32.95 लाख |
फायनल सामन्यात काय झालं?
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघानं निर्धारित 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 137 धावांपर्यंत मजल मारली होती. शान मसूद (38) आणि बाबर आझम (32) यांचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडकडून सॅम करनने भेदक मारा केला. सॅम करन याने 12 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. अदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत सॅम करनला चांगली साथ दिली. पाकिस्ताननं दिलेलं 138 धावांचं आव्हान इंग्लंड संघाने 19 व्या षटकात पार केलं. बेन स्टोक्स याने 52 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी इंग्लंडला विजय मिळवून दिला. त्याशिवाय कर्णधार जोस बटलर याने 26 धावांची खेळी केली.