विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर शिखर धवनने त्याच्या चाहत्यांसाठी एक भावूक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यामध्ये शिखरने म्हटले आहे की, "मी या विश्वचषक स्पर्धेत खेळू शकत नाही, ही गोष्ट सांगताना मला खूप वाईट वाटत आहे. या स्पर्धेत मी माझ्या देशासाठी खेळावे, अशी माझी इच्छा होती. परंतु माझा दुखापतग्रस्त अंगठा बरा होऊ शकलेला नाही. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केलीत, त्यासाठी तुमचे सर्वांचे आभार."
शिखर त्याच्या व्हिडीओमध्ये पुढे म्हणतो की, "आता मला परतावे लागणार नाहे. मला विश्वास आहे की, आपले खेळाडू जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करुन विश्वचषक जिंकतील. तुम्ही सर्वजण आम्हाला पाठिंबा देत रहा. तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप गरजेचा आहे. तुमच्या आतापर्यंतच्या पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद."
शिखरच्या या ट्वीटला रिट्वीट करत पंतप्रधान मोदींनीदेखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "प्रिय शिखर धवन, मैदान तुला मिस करणार आहे, यामध्ये जरादेखील शंका नाही. तुम्ही लवकरच बरे व्हाल. बरे झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा मैदानात उतराल आणि देशाला विजय मिळवून देण्यासाठी स्वतःचे योगदान द्याल."
ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सचा उसळता चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता. मात्र अतिशय वेदना होत असतानाही तो खेळत राहिला. या सामन्यात धवनने 109 चेंडून 117 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
ICC World Cup 2019 : हम परों से नहीं हौंसलों से उड़ते हैं, दुखापतीनंतर धवनचं ट्वीट
या सामन्यात दुखापतीमुळे शिखर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजाने संपूर्ण 50 षटकं क्षेत्ररक्षण केलं होतं. त्यानंतर नॉटिंग्घममध्ये झालेल्या स्कॅनमध्ये धवनच्या बोटात फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता.मात्र अजूनही ही दुखापत भरुन न निघाल्याने शिखर संपूर्ण विश्वचषकातच खेळू शकणार नाही.
टीम इंडियाला मोठा झटका, दुखापतीमुळे शिखर धवन विश्वचषकातून बाहेर | ABP Majha
शिखर धवनने आयसीसीच्या टूर्नामेंट्समध्ये शानदार कामगिरी केली आहे. शिखर धवनने 2015 च्या विश्वचषकात 51.50 च्या सरासरीने 412 धावा केल्या आहे, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (2013-2017) मध्येही धवनची कामगिरी चांगली होती. त्याने 77.88 च्या सरासरीने तीन शतकांच्या मदतीने 701 धावा केल्या आहेत. या विश्वचषकात देखील शिखरने ऑस्ट्रेलियाविरुध्द 117 धावांची करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.