मुंबई : एमएमआरडीएची हद्द वाढवण्याचा ठराव विधानसभेत मंजूर झाला आहे. त्यामुळे एमएमआरडीएच्या मुंबईचं संपूर्ण क्षेत्र, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे मिळून होणार आहे. पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला पालघर, पूर्वेला तानसा नदी तर दक्षिणेला खालापूर पर्यंत एमएमआरडीएची हद्द असेल.
मेट्रो-मोनो प्रकल्प, ट्रान्स हार्बर लिंक, धरणांची कामे, नैना सिटी प्रकल्प, विरार ते अलिबाग मल्टी कॉरिडॉर प्रकल्प, वसई -विरार नॉलेज ग्रोथ सेंटर या महत्वाच्या प्रकल्पांना एमएमआरडीएमार्फत निधी आणि चालना मिळेल. या उद्देशाने एमएमआरडीएची हद्द वाढवण्याचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत सर्व आस्थापनांमध्ये आता समन्वय साधता येणं शक्य होईल.
एमएमआरडीएचं क्षेत्र आता पश्चिमेकडे अरबी समुद्र, उत्तरेकडे पालघरची उत्तर आणि पूर्व सीमा, वसई तालुक्याची तानसा नदीपर्यंत पूर्व सीमा आणि तानसा नदी, पूर्वेकडे कल्याण, भिवंडी, अंबरनाथ यांच्या पूर्व सीमा, कर्जत तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली गावे, खालापूर तालुक्याची पूर्व सीमा आणि दक्षिणेकडे खालापूर, पेण, अलिबाग या तालुक्यांच्या दक्षिण सीमा असं असणार आहे.