मुंबई : गरोदरपणानंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या सानिया मिर्झाने आई झाल्यानंतर चार महिन्यांमध्ये 26 किलो वजन कमी केलं आहे. सानिया मिर्झाने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या माध्यामातून तिने सांगितलं आहे की, जवळपास दोन वर्ष टेनिस कोर्टपासून दूर राहिल्यानंतर तिची शारीरिक स्थिती काय होती आणि आता काय आहे?
सानिया मिर्झाने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, '89 किलो ते 63. आपल्या सर्वांचं एक ध्येय असतं. दररोज लक्ष्य आणि दीर्घकाळ असणारं लक्ष्य.. आपल्या सर्वांना या गोष्टींवर गर्व असला पाहिजे. मी आई झाल्यानंतर पुन्हा फिट होण्यासाठी 4 महिने लागले. असं वाटत आहे की, पुनरागमन केल्यानंतर आणि पुन्हा फिट झाल्यानंतर एवढ्या मोठ्या स्तरावर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खूप वेळ लागला. अनेक लोक सांगतात की, तुम्ही करू शकत नाही. पण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. त्यानंतर कोणत्याच गोष्टिंचा फरक पडत नाही. जर मी हे करू शकते, तर प्रत्येक व्यक्ती करू शकते.'
सानिया मिर्झाचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेक फॅन्स कमेंट्स करून तिने घेतलेल्या मेहनतीचं कौतुक करत आहेत.
सानियाने गरोदरपणानंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. तिने काही हलके कार्डियो एक्सरसाइजच्या मदतीने सुरुवात केली. वजन कमी करण्याबाबत मात्र तिचा निश्चय पक्का होता. एवढचं नाहीतर वजन कमी करण्याचं आपलं ध्येय तिने कधीच सोडलं नाही. आपल्या वर्कआउट रूटीनसोबत, सानियाने संतुलित आहाराचाही आपल्या दैनंदिन जीवनात समावेश केला. तीन वेळा ग्रँड स्लँम विजेता सानिया मिर्झाने जानेवारीमध्ये होबार्ट इंटरनॅशनल टूर्नामेंट जिंकत इंटरनॅशनल सर्किटमध्ये पुनरागमन केलं होतं.
संंबंधित बातम्या :
वजन कमी करायचंय?; दररोज करा आवळ्याच्या ज्यूसचं सेवन, होतील फायदेच फायदे
नाश्त्यासाठी पोहे खाल्याने होऊ शकतं वजन कमी; पण कसं?
हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' टिप्स; होतील भरपूर फायदे