US Open 2020 Men's Single | सहा वर्षांनी यूएस ओपनला नवा चॅम्पियन, ऑस्ट्रियाचा डॉमनिक थीम विजेता
US Open 2020 Men's Single Winner | ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने यूएस ओपन 2020 चं विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत डॉमनिक थीमने जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवला पराभूत केलं. डॉमनिक थीमच्या रुपात यूएस ओपनला सहा वर्षांनंतर नवा चॅम्पियन मिळाला आहे.
न्यूयॉर्क : ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थीमने यूएस ओपन 2020 चं विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत डॉमनिक थीमने जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवला 2-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 अशा सेटमध्ये पराभूत केलं. डॉमनिक थीमच्या रुपात यूस ओपनला सहा वर्षांनंतर नवा चॅम्पियन मिळाला आहे. त्याच्याआधी 2014 मध्ये क्रोएशियाच्या मारिन सिलिचने यूएस ओपनच्या फायनलमध्ये जपानच्या के केई निशिकोरीला पराभूत केलं होतं.
विशेष म्हणजे जर्मनीचा अलेक्झांड ज्वेरेव आणि ऑस्ट्रियाचा डॉमनिक थीम हे दोघेही पहिल्यांदाच यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. 23 वर्षीय अलेक्झांडर ज्वेरेव हा त्याच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच एखाद्या ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळला. तर 27 वर्षीय डॉमनिक थीम यूएस ओपनच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिलाच ऑस्ट्रियन टेनिसपटू ठरला.
That winning feeling ????@ThiemDomi I #USOpen pic.twitter.com/7Gy9SFaTJY
— US Open Tennis (@usopen) September 14, 2020
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या डॉमनिक थीमचं हे पहिलंच ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद आहे. यूएस ओपनच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात त्याने अलेक्झांडर ज्वेरेवला 2-6, 4-6, 6-4, 6-3, 7-6 अशा सेटमध्ये पराभूत केलं. विशेष म्हणजे यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात पहिले दोन सेट गमावल्यानंतरही जेतेपदावर नाव कोरल्याचं 71 वर्षांनी घडलं आहे. याआधी पांचो गोंजालेजने 1949 मध्ये हा पराक्रम केला होता. पहिल्यांदाच विजेत्याचा फैसला टायब्रेकरद्वारे झाला.
ज्वेरेवची अंतिम फेरीत कडवी झुंज दुसरीकडे 23 वर्षीय अलेक्झांडर ज्वेरेव हा मागील दहा वर्षात ग्रॅण्ड स्लॅमच्या फायनलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. परंतु त्याला पराभवाचा सामना करावा लागला. असं असलं तरी त्याने अंतिम फेरीत डॉमनिक थीमला कडवी झुंज दिली. पहिले दोन सेट जिंकून त्याने सुरुवात चांगली केली. परंतु पुढील दोन सेट त्याने गमावले. तर पाचवा सेट टायब्रेकरपर्यंत नेला. परंतु यामध्ये त्याला यश आलं नाही. याआधी उपांत्य सामन्यात दोन सेटमध्ये मागे पडूनही त्याने स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाला 3-6, 2-6, 6-3, 6-4, 6-3 असं पराभूत करुन अंतिम फेरीत धडक दिली.