(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MIW vs UPW : यूपी वॉरियर्सकडून मुंबई इंडियन्सचा धुव्वा, पाच विकेट्सनी दणदणीत विजय
MIW vs UPW : महिला प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला.
MIW vs UPW : महिला प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. या स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा पहिला पराभव झाला. मुंबई इंडियन्सने दिलेल्या 128 धावांचा पाठलाग करताना युपी वॉरियर्सने 19.3 षटके आणि पाच गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवाला. या विजयाने युपी वॉरियर्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत.
यूपी वॉरियर्सची कर्णधार अॅलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 127 धावा केल्या आणि यूपी वॉरियर्सला विजयासाठी 128 धावांचे लक्ष्य मिळाले. यूपी वॉरियर्सकडून ग्रेस हॅरिसने सर्वाधिक म्हणजे 28 चेंडूत 39 धावा केल्या. यामध्ये तिने 7 चौकार मारले. याशिवाय ताहिला मॅकग्राने 25 चेंडूत 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तिने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. मुंबई इंडियन्ससाठी अमिला केरने सर्वाधिक 2 बळी घेतले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यस्तिका भाटिया 15 चेंडूत 7 धावा करून बाद झाली. त्यानंतरही मुंबई इंडियन्सच्या विकेट्स पडतच राहिल्या. शेवटपर्यंत त्यांची पडझड थांबली नाही. त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. मुंबई इंडियन्ससाठी सलामीवीर हेली मॅथ्यूजने 30 चेंडूत सर्वाधिक 35 धावा केल्या. यात तिने 1 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय इसाक वँगने 19 चेंडूत 32 धावांची खेळी खेळली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले.
हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सलग पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ आधीच प्लेऑफमध्ये (WPL Playoffs) पोहोचला आहे. तरी देखील आज मुंबई इंडियन्सने आज यूपी वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी लढत दिली. परंतु, अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात यूपी वॉरियर्सने विजय मिळवला. महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्स संघाची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. यूपी संघाने सहा पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर तीन सामने गमावले आहेत. परंतु, यूपी वॉरियर्सच्या आजच्या विजयाने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत.
मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सचा महिला संघ
मुंबई इंडियन्स महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रियांका बाला, यास्तिका भाटिया, नीलम बिश्त, हीदर ग्रॅहम, धारा गुजर, सायका इशाक, जिंतिमनी कलिता, अमनजोत कौर, हुमैरा काझी, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, नॅट सिव्हर ब्रंट, , पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, सोनम यादव.
यूपी वॉरियर्स महिला संघ : अलिसा हिली (कर्णधार), अंजली सरवानी, लॉरेन बेल, पार्श्वी चोप्रा, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, ग्रेस हॅरिस, शबनीम इस्माईल, ताहलिया मॅकग्रा, किरण नवगिरे, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, शिवाली शेख, शिमना शेख देविका वैद्य, सोप्पधंडी यशश्री.