नवी दिल्ली : भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झाला आता संयुक्त अरब अमिरातीचा गोल्डन व्हिजा मिळाला आहे. त्यामुळे सानिया मिर्झा आता यूएईमध्ये खेळाशी संबंधित कोणताही व्यवसाय करु शकते. अशा प्रकारचा व्हिजा मिळणारी ती आता तिसरी भारतीय व्यक्ती ठरली आहे. सानिया मिर्झा व्यतिरिक्त तिचा पती शोएब मलिकलाही यूएईचा गोल्डन व्हिजा मिळाला आहे.
हैदराबादची रहिवासी असलेली 34 वर्षीय सानिया मिर्झा आणि पाकिस्तानच्या सियालकोटचा रहिवासी असलेला 39 वर्षीय शोएब मलिक यांनी 2010 साली लग्न केलं होतं. लग्नानंतर सानिया आणि शोएब हे दोघेही दुबईला राहू लागले. या जोडप्याला तीन वर्षांचा एक मुलगा असून इजहान असं त्याचं नाव आहे.
यूएई सरकारने 2019 साली आपल्या देशातील व्हिजा मध्ये गोल्डन व्हिजाची भर टाकली. त्या माध्यमातून परदेशी नागरिकांना राष्ट्रीय प्रायोजकाविना देशात राहणे आणि व्यवसाय करण्याची मूभा दिली जाते. ही सुविधा पाच आणि दहा वर्षांसाठी दिली जाते. त्यानंतर त्याचे नूतनीकरणही केलं जातं.
गोल्डन व्हिजा मिळाल्यानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी आनंद व्यक्त केला आहे. दुबई हे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी नेहमीच जवळचं असल्याचं सांगत सानिया मिर्झाने हा गोल्डन व्हिजा दिल्याबद्दल दुबईचे शेख मोहम्मद बिन राशिद यांचे आभार मानले आहेत. या दोघांनी खेळाशी संबंधित व्यवसाय सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.
यूएईने या आधी स्टार फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो, लुईस फिगो आणि नोवाक जोकाव्हिच यांनाही गोल्डन व्हिसा दिला आहे. सानिया मिर्झाच्या आधी बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि संजय दत्त या भारतीयांना यूएईने गोल्डन व्हिसा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gujarat High Court : गुजरात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, आजपासून कारवाईचे होणार लाईव्ह प्रक्षेपण
- Ashadhi Wari : वर्ध्याचे केशव कोलते ठरले मानाचे वारकरी, मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेत सहभागी होणार
- Coronavirus : येणारे तीन-चार महिने अत्यंत महत्वाचे; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा इशारा