नवी दिल्ली : देशातील कोरोना संक्रमणाची स्थिती आता नियंत्रणात आहे, पण येत्या काळात आपण कोरोनाच्या नियमांचे पालन केलं नाही तर परिस्थिती पुन्हा बिघडू शकते. त्यामुळे येणारे 100 ते 125 दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहेत असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राने प्रशासनाला आणि नागरिकांना हा इशारा दिला आहे.
निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, "भारतातील मोठ्या लोकसंख्येवर अजूनही कोरोनाच्या संकटाचे सावट आहे. ही लोकसंख्या अद्याप हर्ड इम्युनिटी लेव्हलपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे धोका टळला नाही. लसीकरणाची गती वाढवल्यास आपण सुरक्षित होऊ शकतो. त्यामुळेच येणारे 100 ते 125 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या काळात आपण कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करणे आवश्यक आहे."
निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितलं की, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांत कोरोनाची स्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळेच संपूर्ण जगभरात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही तशा प्रकारची चिंता व्यक्त करुन सर्व देशांना उपाययोजना करण्यास सांगितलं आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यामुळे 95 टक्के मृत्यू कमी झाल्याचं डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "आपण जर ठरवलं तर देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकणार नाही. लसीकरणाचा वेग वाढवला आणि येत्या तीन ते चार महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यास आपण कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचाव करु शकतो."
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Cases : राज्यात आज 13, 452 रुग्णांना डिस्चार्ज, 7,761 रुग्णांची भर; 26 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही
- Ashadhi Wari : वर्ध्याचे केशव कोलते ठरले मानाचे वारकरी, मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेत सहभागी होणार
- सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार: सुभाष देशमुख