नवी दिल्ली : टीम इंडिया आणि श्रीलंकेदरम्यान दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर तिसरी कसोटी खेळवण्यात येत आहे. या सामन्यात श्रीलंकेचे खेळाडू बराच वेळ मास्क लावूनच मैदानात खेळताना दिसत होते. या सामन्यादरम्यान, प्रदूषणाचा बराच त्रास झाल्याची तक्रार श्रीलंकन खेळाडूंकडून वारंवार करण्यात येत होती.


दरम्यान, या सर्व घटनेनंतर बीसीसीआयनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 2020 पर्यंत क्रिकेटचे कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने या मैदानात खेळवण्यात येणार नाही.

बीसीसीआयच्या रोटेशन पॉलिसीनुसार, आता दिल्लीत 2020 पर्यंत एकही आतंरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येणार नाही.

बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'रोटेशन पॉलिसीनुसार, कोटलावर एक कसोटी सामना आणि नोव्हेंबरमध्ये एक टी-20 सामना खेळवण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षापर्यंत तरी दिल्लीत सामना होणार नाही. इतर ठिकाणीही सामने भरवणं बाकी आहे त्यामुळे 2019 साली जेव्हा नवीन दौऱ्याची आखणी केली जाईल त्यानंतरच कोटलावर बहुदा सामने खेळवले जातील.

'2020 साली पर्यावरणाची स्थिती कशी असेल याबाबत मी आता काही सांगू शकत नाही. त्यामुळे कोटलावर सामने न खेळवण्याचा निर्णय हा फक्त रोटेशन पॉलिसीनुसार असणार आहे.' असंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.

दिल्लीतील या कसोटीत प्रदूषणामुळे तब्बल 26 मिनिटं खेळ थांबवण्यात आला होता. यावेळी त्या दिवसाचा खेळ थांबवण्यात यावा अशी मागणीही श्रीलंकन खेळाडूंनी केली होती. पण पंचांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली होती.