मुंबई: बर्मिंगहॅममध्ये ऑल इंग्लंड ओपन 2023 (All England Open 2023) स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली (Gayatri Gopichand and Treesa Jolly) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोरियाच्या बॅडमिंटनपटू बाक ना हा आणि ली सो ही यांच्याकडून 21-10, 21-10 असा सरळ सेटमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली यांचे  स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. 


जागतिक क्रमवारीत 17व्या क्रमांकावर असलेली  गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली ही भारतीय जोडी मागील वेळच्या ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतही  उपांत्य फेरीत पोहोचली होती आणि चीनच्या जू जियान झांग आणि यू झेंग यांच्याकडून पराभूत झाली होती.


सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतर ती आघाडी गायत्री आणि त्रिशाला कायम ठेवता आली नाही. नंतर त्यांची पिछेहाट सुरू झाली. पहिल्या गेममध्ये मागे असलेल्या कोरियन जोडीने 14-10 वरून 21-10 अशी बरोबरी साधली. नंतपरच्या वेळेत भारतीय जोडीला सावरण्याची एकही संधी मिळाली नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 


त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद पुलेला या भारतीय जोडीने शुक्रवारी ली वेन मेई आणि लियू झुआन जुआन यांच्यावर 21-14, 18-21, 21-12 असा विजय मिळवत सलग दुसऱ्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्याआधी जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानी असलेल्या या जोडीने त्यांच्या दुसऱ्या फेरीतील लढतीत युकी फुकुशिमा आणि सायाका हिरोटा या जोडीचा 21-14, 24-22 असा पराभव केला होता. पहिल्या फेरीत त्यांनी थायलंडच्या जोंगकोल्फान कितिहारकुल आणि रविंदा प्रजोंगाई या जोडीचा पराभव केला होता.


दरम्यान, गेल्या वर्षीच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत यांना या आधीच स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे या स्पर्धेतील भारताचे पुरुष एकेरीचे आव्हान संपुष्टात आलं आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला गुरुवारी दुसऱ्या फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.


महिला एकेरीत, भारतीय बॅडमिंटन स्टार आणि दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू पहिल्या फेरीत बाहेर पडली तर माजी जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या सायना नेहवालने स्पर्धेतून माघार घेतली.


ही बातमी वाचा: