मुंबई : येत्या 19 मार्च रोजी म्हणजे उद्या शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रभर विविध ठिकाणी उपवास केला जाणार आहे. किसानपूत्र आंदोलनाचे (Kisan Putra Andolan) अमर हबीब (Amar Habib) यांनी याबाबतची माहिती दिली. 19 मार्च 1986 रोजी शेतकरी साहेबराव करपे कुटुंबीयांनी आत्महत्या केली होती. करपे कुटंब हे चिलगव्हाण (जि. यवतमाळ) येथील होते. त्यामुळेच या गावात 19 मार्च रोजी सुतक पाळले जाणार असून सामूहिक उपोषण देखील केले जाणार आहे, अशीही माहिती अमर हबीब यांनी दिली.  


19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपली पत्नी व चार लेकरांसह विनोबा भावेंच्या आश्रमात पवनारला आत्महत्या केली होती. सरकारी अहवालानुसार ही देशातील पहिली आत्महत्या समजली जाते. आत्महत्या करण्यापूर्वी साहेबराव करपे यांनी शेतकऱ्यांच्या भीषण अवस्थेचे वर्णन करणारे एक पत्र लिहिले होते. त्या पत्रामधे त्यांनी आपल्या आत्महत्येमुळे तरी निदान सरकारला जाग येईल आणि इतर शेतकऱ्यांसाठी सरकार काही चांगली धोरणे आखतील अशी आशा व्यक्त केली होती.  त्यामुळे याच दिवशी म्हणजे 19 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सामुहिकरित्या किंवा वैयक्तिकरित्या किंवा आपलं काम करताना सुद्धा एक दिवसाचा उपवास अन्नदात्यासाठी करावा अशी या आंदोलनाची संकल्पना आहे. याच संकल्पनेतून उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उपवास केला जाणार आहे.  


 2017 पासून दर वर्षी उपोषण, उपवास किंवा अंन्नत्याग केला जातो. या वर्षी दोन्ही शेतकरी संघटनांसह अनेक स्थानिक संस्था व संघटना या उपवास आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. लंडनमध्ये देखील हा उपवास केला जाणार आहे. 'मी सद्या लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे. एक किसानपूत्र म्हणून उद्या मी देखील माझ्या विद्यापिठालगत असलेल्या महात्मा गांधी यांच्या पूतळ्यासमोर बसून अन्नत्याग करणार आहे, अशी माहिती ॲड. दीपक चटप यांनी दिली आहे. 


अमरावतीच्या पंचवटी चौकात राष्ट्रीय ओबीसी किसान संघाच्या वतीने उपोषण केले जाईल. वाशीम जिल्ह्यात भूमिपूत्र शेतकरी संघटनेकडून ठिकठिकाणी उपोषण केले जाणार आहे. वरुड, मोर्शी, वाटोर, पापड येथे किसानपूत्र व अन्य संघटना मिळून उपवास करणार आहेत. नागपूर, काटोल, उमठा, सावनेर, मूर्तिजापूर, आकोट आदी ठिकाणी उपोषण होणार आहे.


मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथील क्रांती चौकात दिवसभर उपोषण होईल. आंबाजोगाई, धारूर, दिंद्रुड, घटनांदूर, परभणी जिल्ह्यातील दैठणा, जालना जिल्ह्यातील परतूर, वाढोना, जवळाबाजार, साटंबा व लातूर जिल्ह्यातील पानगाव, उदगीर आदी ठिकाणी उपोषणाला लोक बसणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जय किसान शेतकरी संघटनेच्या वतीने पेठ वडगाव येथे उपोषण केले जाणार आहे, नाशिक जिल्ह्यात मुंगसरे, जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव व पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिर येथेही उपोषण होणार आहे, अशी माहिती अमर हबीब यांनी दिली.