Sania Mirza Retirement Tennis India : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढ-उतार सध्या पाहत आहे. तिचा नवरा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. दरम्यान, सानियाने आणखी एक मोठी घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला आहे. सानिया लवकरच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती (Sania Mirza Retirement) घेणार आहे. तिची आतापर्यंतची कारकीर्द भारतासाठी फार प्रभावी ठरली असल्याने हा भारतीय टेनिस चाहत्यांसाठी धक्का आहे.
दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये (Dubai Tennis Championship) सानिया कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार अशीही माहिती समोर येत आहे. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. एका टेनिस खेळासबंधित बातम्या देणाऱ्या संस्थेशी बोलताना सानिया म्हणाली, “मी गेल्या वर्षीच निवृत्तीचा निर्णय घेण्याचं ठरवलं होतं. पण उजव्या कोपराच्या दुखापतीमुळे यूएस ओपन आणि इतर स्पर्धांमधून नाव मागे घ्यावे लागले. मी माझ्या अटींवर जगणारी व्यक्ती आहे. याच कारणामुळे मला दुखापतीमुळे बाहेर पडायचे नव्हते तर मैदानातून निवृत्ती घ्यायची होती. दरम्यान आता मी सराव करत आहे. दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर मी आता निवृत्तीची योजना आखली आहे.''
विशेष म्हणजे सानियाने तिच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. यासोबतच तिला अनेकवेळा पुरस्कारांनीही गौरविण्यात आले. सानियाने ऑस्ट्रेलियन ओपन 2016, विम्बल्डन 2015, यूएस ओपन 2015 आणि त्यासोबत अनेक महत्त्वाच्या स्पर्धांत कमाल कामगिरी करत विजय मिळवला आहे. सानियाला 2004 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यानंतर तिला 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. अशा उत्कृष्ट कारकिर्दीनंतर सानिया आता निवृत्तीचा निर्णय घेत आहे.
सानियाची कारकिर्द थोडक्यात
सानिया मिर्झा हिने महिला डबल्समध्ये 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2015 मध्ये विम्बलडन आणि यूएस ओपन या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसंच मिक्स्ड डबल्समध्ये तिने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये यूएस ओपन या स्पर्धा जिंकल्या आहे.
हे देखील वाचा-