हैदराबादः रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते आज चौघांना बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून देण्यात आल्या.
गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये हा सोहळा पार पडला. हैदराबाद डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने या आलिशान कार देण्यात आल्या. देशासाठी अशीच विजयी कामगिरी करत रहा, अशा शब्दात सचिनने सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
माजी क्रिकेटर आणि उद्योगपती चमुंडेश्वरनाथ यांनी पीव्ही सिंधूला सचिनच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार देण्याची घोषणा केली होती. मात्र नंतर इतर तिघांनाही कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. गोपीचंदच खरे हिरो असल्याचं मत यावेळी दीपा कर्माकरने व्यक्त केलं.
रिओ ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूने महिला बॅडमिंटनमध्ये भारतासाठी रौप्य पदकाची कमाई केली आहे. तर साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळवलं. दीपा कर्माकरला जिम्नॅस्टीकमध्ये चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.