उस्मानाबादः पतीच्या मृत्यूनंतर शेतीवर उपजिविका भागवणाऱ्या महिलेने शेतीसाठी खाजगी सावकारांकडून पाच लाखांचं कर्ज घेतलं. परंतु, पाच लाख कर्जाच्या बदल्यात वीस लाखांची परतफेड करूनही सावकारांकडून छळ सुरु असल्याने ग्रामपंचायत सदस्य महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात ही घटना घडली.


 

वनमाला चंद्रकांत गायकवाड असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. पाच लाखांच्या बदल्यात 20 लाख दिले, गहाण ठेवलेल्या प्लॉटच्या रजिस्ट्री देण्यास सावकाराने टाळाटाळ केली आणि जमिनीवर नजर ठेऊन अधिक वसुलीच्या लालसेने सातत्याने मानसिक छळ सुरू केला. त्यामुळे हतबल झालेल्या वनमाला यांनी काल रात्री साडे दहाच्या सुमारास विष प्राशन केलं.

 

कळंब तालुक्यातील भाट शिरपुरा येथे ही घटना घडली. सदरील महिलेचा अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात उपचारादरम्यान मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या महिलेने विष प्राशन करण्यापूर्वी कर्जासाठी त्रास देणाऱ्या सावकारांची नावे एका चिठ्ठीत लिहून ती मुलीकडे दिली होती. या चिठ्ठीत कळंब तालुक्यातील काही राजकीय पुढारी, नगरसेवक यांच्या नावाचाही समावेश आहे.

 

वनमाला भाट शिरपुरा येथील ग्रामपंचायतीच्या शिवसेनेकडून विद्यमान सदस्या असल्याची माहिती आहे. वनमाला यांची दोन्ही मुले स्वप्निल आणि सुमित यांच्या तक्रारीवरून पुढील तपास सुरू आहे.