टी-20 मध्ये जलद शतक ठोकणारा राहुल पहिला भारतीय खेळाडू
एबीपी माझा वेब टीम | 28 Aug 2016 04:29 AM (IST)
फ्लोरिडा(अमेरिका): अमेरिकेतील फ्लोरिडात झालेल्या सामन्यात भारताचा फलंदाज के. एल. राहुलने विश्वविक्रम नावावर केला आहे. ट्वेंटी ट्वेंटीमध्ये सर्वात जलद शकत ठोकणारा राहुल हा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. तर जगातील दुसरा खेळाडू बनला आहे. भारताला या सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना एका धावाने पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या चेंडूवर कर्णधार धोनी बाद झाल्यामुळे हाताशी आलेला सामना गमवावा लागला. मात्र के. एल. राहुलने ट्वेंटी ट्वेंटीमधील पहिलं शतक साजरं करत विश्वविक्रमाला गवसणी घातली. काय आहे विश्वविक्रम? राहुलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 46 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. त्याने एकूण 51 चेंडूंचा सामना करत नाबाद 110 धावा ठोकल्या. यापूर्वी एवढ्या कमी चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रिचर्ड लेविसच्या नावे होता. रिचर्डने 45 धावांत ट्वेंटी ट्वेंटीमधील सर्वात जलद शतक पूर्ण केलं होतं. वेस्ट इंडिजचा फलंदाज एव्हिन लेविसने याच सामन्यात 48 चेंडूंत शतक झळकावून विक्रम नोंदवला. एव्हिन ट्वेंटी ट्वेंटीमध्ये जलद शतक ठोकणारा वेस्ट इंडिजचा दुसरा खेळाडू ठरला तर पाचवं आंतरराष्ट्रीय जलद शतक ठरंल. यापूर्वी वेस्ट इंडिजचा धडाकेबाद फलंदाज ख्रिस गेलने इंग्लंडविरुद्ध खेळताना 47 चेंडूंत ट्वेंटी ट्वेंटीमधलं जलद शतक ठोकलं आहे.