Russia in FIFA 2022 :  रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आता जवळपास महिना होत आला आहे. रशियाकडून अजूनही माघार घेतली गेलेली नाही. दरम्यान या युद्धाचे पडसाद जगभरात तसंच विविध क्षेत्रांवर उमटत आहेत. रशियाला विविध स्पर्धांमधून बॅन करण्यात आलेले आहे. युएफा, फिफा अशा स्पर्धांसह एफ1 शर्यतसारख्या स्पर्धांतून देखील रशियाला बाहेर करण्यात आले. दरम्यान फिफा अर्थात फुटबॉल विश्वचषक या मानाच्या स्पर्धेत यंदातरी रशियाचं खेळणं अशक्यचं दिसत आहे. सर्वोच्च क्रीडा न्यायालय कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) ने रशियन फुटबॉल युनियनची फिफामध्ये खेळण्याची विनंती फेटाळली आहे. फिफामधून रशियन संघांला आणि त्यांच्या क्लब्सना विविध स्पर्धांमधून निलंबित करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.



नुकत्याच (शुक्रवार) झालेल्या या निर्णयामुळे रशियाला या महिन्याच्या अखेरीस होणार्‍या विश्वचषक पात्रता प्लेऑफमध्ये भाग घेता येणार नाही. त्यामुळे रशियाचे यंदा विश्वचषक खेळणे अशक्यचं दिसत आहे.  FIFA आणि UEFA यांनी एकत्रितपणे रशियन संघांना स्पर्धेत खेळण्यापासून बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर घेतलेला हा निर्णय पुढील सूचना मिळेपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर CAS ने एका निवेदनात म्हटले आहे की, "हा निर्णय कायम आहे आणि सर्व रशियन संघ आणि क्लब्सना फिफा स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून निलंबित केले गेले आहे."


रशियाकडून हल्ला सुरुच


रशिया आणि युक्रेनमधील युद्ध 23 व्या दिवशीही सुरूच आहे. दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याच्या चर्चेला अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, रशियाची आक्रमक भूमिका कायम आहे. 23 तारखेलाही रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्बस्फोट केले. रशियन सैनिकांनी खारकिव्हजवळ हवाई हल्लाही (Airstrike) केला. हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर रशियाने युद्ध थांबवण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेशही फेटाळत युक्रेनवरील हल्ला सुरुच ठेवला आहे.



हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha