Football World Cup: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम आता वेगवेगळ्या क्षेत्रात उमटत आहेत. फिफाने रशियाच्या फुटबॉल संघावर कारवाई करत त्यांना वर्ल्डकप मधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रशियाच्या फुटबॉल संघाला सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यामधून बाहेर काढण्याचा निर्णय फिफा तसेच UEFA ने घेतला आहे.
UEFA ने ही कारवाई करत या चॅम्पियन लिगची स्पॉन्सर असलेली रशियन कंपनी गॅझप्रोमशी असलाला आपला सर्व करार संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी फिफा आणि UEFA ने हा निर्णय जाहीर केला आहे. पुढील सूचना येईपर्यंत ही बंदी कायम असेल असं या दोन्ही संघटनांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्याचं ठिकाण या युद्धामुळे बदलण्यात आलं आहे. आधी या स्पर्धेचा अंतिम सामना रशियातील प्रसिद्ध फुटबॉल स्टेडियम सेंट पीटर्सबर्ग येथे होणार होता. पण आता हे ठिकाण बदलून पॅरिस करण्यात आलं आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या चार तासांपासून बेलारुसच्या सीमेवर रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची बैठक सुरु आहे. या बैठकीत युक्रेननं राजधानी कीव्हसह डोनबास आणि क्रीमियातून रशियन सैन्य हटवण्याची मागणी केली आहे. रशियानं तातडीने शस्त्रसंधी करावी अशी मागणी झेलेन्स्की यांनी केलीय. त्यामुळे आता बेलारुसमध्ये होणाऱ्या बैठकीत काय होणार? रशिया-युक्रेन युद्ध संपणार का याकडं जगाचं लक्ष लागलंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha