मुंबई : भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरनं रणजी करंडकात आंध्रविरुद्धच्या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. जाफरच्या रणजी कारकीर्दीतला हा 150वा सामना ठरला. रणजी करंडकाच्या आजवरच्या इतिहासात दीडशे सामने खेळणारा जाफर हा पहिलाच फलंदाज ठरला. जाफरनं आजवरच्या रणजी कारकीर्दीत 150 सामन्यात 11 हजार 775 धावांचा रतीब घातलाय. त्यात सर्वाधिक 40 शतकांचा समावेश आहे. वासिमनंतर या यादीत दुसऱ्या स्थानावर देवेंद्र बुंदेला तर तिसऱ्या स्थानावर अमोल मजूमदार आहे.


सर्वाधिक रणजी सामने खेळणारे खेळाडू

  • वासिम जाफर - 150

  • देवेंद्र बुंदेला - 145

  • अमोल मजूमदार- 136


वसिम जाफरने मुंबईकडून रणजी खेळायला सुरुवात केली. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तो विदर्भाच्या संघात दाखल झाला. मागील दोन्ही हंगामात विदर्भाने जेतेपद पटकावले आहे. या दोन्ही वर्षी वसिम या संघात होता. जाफरने 1996/97 मध्ये रणजी खेळण्यास सुरुवात केली. भारतातील 150 रणजी सामने खेळणारा वासिम जाफर हा एकमेव खेळाडू आहे. वासिमने डोमेस्टिक क्रिकेट आतापर्यंत 40 शतकं ठोकली आहेत. तर रणजीमध्ये 11,000 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू आहे.

वासिम जाफरने भारतासाठी 31 कसोटी सामने खेळले आहे. त्यामध्ये त्याने एकू 1944 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा अॅव्हरेज 34.10 असा आहे. जाफरने जेव्हा भारतीय संघासाठी खेळत होता, त्यादरम्यान त्याने 5 शतकं आणि 11 अर्धशतकं केली होती. जाफरने त्याच्या कारकीर्दीत दोन दुहेरी शतकही झळकावली आहेत. ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 212 आणि 202 धावा केल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

रणजी ट्रॉफीच्या विदर्भ वि. आंध्र प्रदेश सामन्यादरम्यान मैदानात साप, खेळाडूंची धावपळ

रणजीचा रणसंग्राम : मुंबई, विदर्भाची दमदार सुरुवात; महाराष्ट्राच्या गोलंदाजांकडून निराशा