मुंबई : रणजी करंडकाच्या महासंग्रामाला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेचा पहिलाच दिवस मुंबईच्या फलंदाजांनी आणि विदर्भाच्या गोलंदाजांनी गाजवला. पण महाराष्ट्र आणि हरयाणा संघांमधल्या सामन्यात हरयाणवी फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.


विदर्भासमोर आंध्र प्रदेशचं लोटांगण


आदित्य सरवटे आणि रजनीश गुरबानीच्या प्रभावी माऱ्यासमोर विदर्भानं सलामीच्या रणजी सामन्यात आंध्रचा पहिला डाव 211 धावांत गुंडाळला. टीम इंडियाचा युवा कसोटीवीर हनुमा विहारीचा अपवाद वगळता आंध्रच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विहारीनं 83 धावांचं योगदान दिलं. डावखुरा फिरकी गोलंदाज आदित्य सरवटेनं चार आणि रजनीश गुरबानीनं 3 फलंदाजांना माघारी धाडलं. तर यश ठाकूरनं दोन आणि ललित यादवनं एक विकेट घेतली.


आंध्र प्रदेश - 211/10
विदर्भ - 26/0 (पहिल्या दिवसअखेर)


मुंबईची दमदार फलंदाजी


पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेनं रणजी करंडकात बडोद्याविरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतकं साजरी केली. त्यानंतर तळाच्या शम्स मुलानी आणि शार्दूल ठाकूरनंही बडोद्याच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत अर्धशतकं झळकावली. त्यामुळे मुंबईनं पहिल्या दिवसअखेर आठ बाद 380 धावांची मजल मारली आहे. पृथ्वीनं अकरा चौकार आणि एका षटकारासह 66 धावांची खेळी उभारली. या कामगिरीसह पृथ्वीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केलं. अजिंक्य रहाणेनं 10 चौकारांसह 79 धावांची खेळी साकारली. तर शम्सनं नाबाद 56 आणि शार्दूलनं 64 धावा फटकावल्या.


मुंबई - 380/8 (पहिल्या दिवसअखेर)


महाराष्ट्राच्या गोलंदाजांची निराशा


रणजी करंडकाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी मात्र निराशा केली. रोहतकमध्ये सुरु असलेल्या सामन्यात हरयाणानं पहिल्या दिवशी 3 बाद 279 अशी मजल मारली आहे. हरयाणाच्या शुभम रोहिला आणि शिवम चौहाननं खणखणीत शतकं झळकावली. महाराष्ट्राकडून समद फल्ला, अनुपम संकलेचा आणि प्रदीप दधेनं प्रत्येकी एक विकेट घेतली.


हरयाणा - 279/3 (पहिल्या दिवसअखेर)


वासिम जाफरचा 150 वा सामना


दरम्यान विदर्भाच्या वासिम जाफरनं आज रणजी करंडकात आंध्रविरुद्धच्या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. जाफरच्या रणजी कारकीर्दीतला हा 150 वा सामना ठरला. रणजी करंडकाच्या आजवरच्या इतिहासात दीडशे सामने खेळणारा जाफर हा पहिलाच फलंदाज ठरला. जाफरनं आजवरच्या रणजी कारकीर्दीत 150 सामन्यात 11 हजार 775 धावांचा रतीब घातलाय. त्यात सर्वाधिक 40 शतकांचा समावेश आहे.