Kidambi Srikanth : भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली. अंतिम सामन्यात पराभूत झाल्याने त्याच सुवर्णपदक थोडक्यात हुकलं खरं पण त्याने मिळवलेल्या रौप्य पदकासह अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. त्यामुळे श्रीकांतचं सर्व स्तरातून कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्रीकांतचं खास शब्दात कौतुक केलं आहे. 


पीएम मोदींकडून खास कौतुक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन ट्वीट करत श्रीकांतचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘किदम्बी श्रीकांतने ऐतिहासिक कामगिरी करत मिळवलेल्या रौप्य पदकाबद्दल त्याचं अभिनंदन. हा विजय अनेक खेळाडूंसाठी प्रेरणा बनणार असून त्यामुळे अनेकांची बॅडमिंटन खेळातील आवड आणखी वाढेल.’



थोडक्यात श्रीकांतचा पराभव


सामन्याच्या सुरुवातीला श्रीकांतने चांगली सुरुवात केली त्याने 9-7 ची लीड घेतली. पण त्यानंतर सिंगापूरच्या लोहने पुनरागमन करत 11-11 ची बरोबरी साधली. ज्यानंतर सामन्यात एकहाती पुढे जात पहिला सेट लोहने 21-15 ने जिंकला. त्यानंतर दुसरा सेट चुरशीचा झाला. पण लोहने अखेरच्या काही वेळेत अप्रतिम खेळ दाखवत सेट 22-20 ने जिंकला. ज्यामुळे सामनाही लोहने खिशात घातला. श्रीकांतने उपांत्य फेरीमध्ये भारताच्याच लक्ष्य सेनला मात देत अंतिम सामन्यात स्थान मिळवलं होतं. श्रीकांतनं उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्य सेनवर 17-21, 21-14, 21-17 असा विजय मिळवला होता. फायनलमध्ये पोहोचल्याने श्रीकांतने याआधीच इतिहास रचला होता. कारण जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा श्रीकांत पहिलाच खेळाडू होता. त्यामुळे अंतिम सामन्यात पराभूत होऊनही श्रीकांतने रौप्य पदकावर नाव कोरल्याने त्याने इतिहास लिहिला आहे. भारतीय खेळाडूला प्रथमच या जागतिक स्पर्धेत रौप्य पदक मिळालं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha