Srikanth Kidambi : भारताचा बॅडमिंटनवीर किदम्बी श्रीकांतनं नवा इतिहास घडवला आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या इतिहासात एकेरीची फायनल गाठणारा श्रीकांत हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. त्यानं भारताच्याच लक्ष्य सेनचं कडवं आव्हान मोडीत काढून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. श्रीकांतनं उपांत्य फेरीच्या सामन्यात लक्ष्य सेनवर 17-21, 21-14, 21-17 असा विजय साजरा केला. पण हा सामना जिंकण्यासाठी त्याला 68 मिनिटं संघर्ष करायला लागला.या सामन्यात झालेल्या पराभवामुळं लक्ष्य सेनला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. जागतिक बॅडमिंटनचं कांस्यपदक मिळवणारा तो प्रकाश पडुकोण आणि बी. साई प्रणित यांच्यानंतर तिसरा भारतीय पुरुष ठरला. पडुकोण यांनी 1983 साली आणि प्रणितनं 2019 साली जागतिक बॅडमिंटनचं कांस्यपदक पटकावलं होतं. 


अंतिम फेरीतील किदाम्बी श्रीकांतचा सामना आता डेन्मार्कचा अँडर अँटोनसेन आणि सिंगापूरचा केन येव लोह यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होणार आहे. किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी उपांत्य फेरीत प्रवेश करत देशासाठी दोन पदकांवर शिक्कामोर्तब केलं होतं. पराभवानंतर सेनला आता कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे.


दरम्यान, अंतिम सामन्यात सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचण्याची संधी किदाम्बी श्रीकांतकडे आहे. तसेच कांस्य पदक पटकावणाऱ्या लक्ष्य सेननंही आपलं नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवलं आहे. लक्ष्य सेननं दिग्गज प्रकाश पादुकोन आणि बी साई प्रणीत यांच्या यादीत समावेश केला आहे. प्रकाश पादुकोन यांनी 1983 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं, तर प्रणीत यांनी 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकावर नाव कोरलं होतं.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :